म्हैसूरमध्ये सीसीबी पोलिसांची कारवाई : पाच जणांना अटक
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाबाधित रुग्णांसाठी संजीवनी ठरणाऱया रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असतानाच या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन बनावट रेमडेसिवीर औषधाची विक्री करणारी टोळी म्हैसूरमध्ये गजाआड करण्यात आली आहे. याप्रकरणी म्हैसूरच्या सीसीबी पोलिसांनी जेएसएस इस्पितळाचा स्टाफ नर्स गिरीश याच्यासह त्याला सहकार्य करणाऱया शिवप्पा, मंगळा, मंजुनाथ व प्रशांत यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अटकेतील आरोपींकडून 2.82 लाख रुपये रोख आणि 800 हून अधिक बनावट रेमडेसिवीर औषधांच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. गिरीश हा सेप्ट्रीयोक्सोन नामक ऍन्टीबायोटीक औषध आणि सामान्य सलाईनचा वापर करून बनावट औषध तयार करून त्याची 4 हजार रुपयांना विक्री करत होता. शिवाय हे बनावट औषध एमआरद्वारे नागरीक आणि काही इस्पितळांना पुरवठा करत होता, असा आरोप आहे. रेमडेसिवीरची काळय़ा बाजारात विक्री होत आहे का, याचा तपास करत असताना बनावट रेमडेसिवीर तयार करून विक्री करणाऱया टोळीचा पर्दाफाश झाला, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. चंद्रगुप्त यांनी दिली आहे.
प्रमुख आरोपी गिरीश हा मागील 11 वर्षांपासून जेएसएस इस्पितळात स्टाफ नर्स म्हणून काम करत आहे. रिकाम्या झालेल्या रेमडेसिवीर औषध बाटल्यांमध्ये तो आपण तयार केलेले बनावट औषध भरून विक्री करत होता, अशी माहिती तपासातून उघड झाली आहे.