केंद्र सरकारचे राज्य सरकारांना पत्र – मार्गदर्शक तत्वे जारी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना संसर्गावर विकसित करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसी जगभरातील नागरिकांसाठी वरदान ठरत असतानाच आता बाजारात बनावट लसीही येत असल्याचे प्रकार उघड होऊ लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात वापरल्या जाणाऱया कोरोना लसींची सत्यता ओळखण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वांची यादी जारी केली आहे. केंद्र सरकारने यासंबंधी विविध राज्यांना पत्र पाठवत सतर्क केले आहे. सदर पत्रात वेगवेगळय़ा कंपन्यांच्या लसींची सविस्तर माहिती नमूद करण्यात आली आहे. केंद्राने राज्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये लस उत्पादकांनी वापरलेले लेबल, रंग आणि इतर तपशील दिलेले आहेत.
सध्या भारतीय बाजारात कोरोनाव्हायरस विरुद्ध लढण्यासाठी तीन लस उपलब्ध आहेत. यात सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाची ‘कोव्हिशिल्ड’, भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ आणि रशियन लस ‘स्पुटनिक-व्ही’ यांचा समावेश आहे. या तीन लसींच्या माध्यमातून देशात लसीकरण मोहिमेला वेग आला असतानाच आता बनावट कोरोना लस सरकारसाठी चिंतेचा विषय झाला आहे. जागतिक आरोग्य संस्थेने कोविड-19 लसींच्या बनावट आवृत्तीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. यामुळे लसीकरणावर मोठा परिणाम होण्याची शक्मयता वर्तवली जात असतानाच केंद्र सरकारने राज्य सरकारला बाजारात उपलब्ध बनावट कोरोना प्रतिबंधक लस ओळखण्यासाठी काही निकष जारी केले आहेत. सरकारने जारी केलेले निकष योग्यपणे तपासल्यास लस बनावट आहे की खरी आहे हे ओळखण्यास मदत होईल असे आरोग्य मंत्रालयाने राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
बनावट लसीबाबत शहानिशा सुरू
भारतातही काही ठिकाणी बनावट लसी विकल्या जात असल्याचा दावा माध्यमांनी केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने बनावट लसींबद्दल अलर्ट जारी केल्यानंतर केंद्र सरकारने अहवालांच्या आधारे याप्रकरणी चौकशीही सुरू केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा यासंबंधी शहानिशा करत असून आरोपांमध्ये काही तथ्य आढळल्यास केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत.