कॅम्प पोलिसांची कारवाई -लॉकडाऊनच्या काळात घडली होती घटना
प्रतिनिधी/ बेळगाव
सोन्याचे दागिने देण्याचे सांगून बनावट सोने देऊन मोठी रक्कम उचलणाऱया वडगाव येथील एका तरुणाला कॅम्प पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. लॉकडाऊनच्या काळात फसवणुकीचा हा प्रकार घडला होता.
सुमीत प्रमोद रेवणकर (वय 26, रा. दत्तात्रय गल्ली-वडगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी सोमवारी सुमीतला अटक केली आहे. भा.दं.वि. 420 कलमान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी कॅम्प येथील विनय कोठारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुमीत रेवणकर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या घटनेने एकच खळबळ माजली असून सुमीतने सोने देण्याचे सांगून अनेकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
मे 2020 मध्ये फसवणुकीचा हा प्रकार घडला आहे. 7 लाख 80 हजार रुपये घेऊन सुमीतने विनय यांना सोन्याचे दागिने दिले होते. चौकशीअंती सुमीतने दिलेले दागिने बनावट असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच सुमीतकडे सातत्याने पैशाची मागणी करण्यात आली. मात्र, त्याने घेतलेले पैसे परत केले नाहीत. कॅम्प पोलीस पुढील तपास करीत आहेत.