खळबळजनक आर. एन. नायक खून खटला : 4 एप्रिल रोजी सुनावण्यात येणार शिक्षा : न्यायालयात मोठी गर्दी, तीन जण निर्दोष
प्रतिनिधी /बेळगाव
तीन कोटींच्या खंडणीला नकार दिल्याने बन्नंजे राजा ऊर्फ बी. आर. ऊर्फ राजेंद्रकुमार याने अंकोल्याचे उद्योजक आर. एन. नायक यांचा आपल्या हस्तकांकडून गोळय़ा झाडून भीषण खून केला होता. यावेळी उद्योजक आर. एन. नायक यांच्या अंगरक्षकानेही गोळय़ा झाडल्याने तेथेच एका गुंडाचा मृत्यू झाला होता. भरबाजारात हा थरार घडल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधील 12 जणांना अटक करण्यात आली होती. त्यामधील 9 जणांना येथील मुख्य जिल्हासत्र न्यायालय आणि कोका न्यायालयाने दोषी ठरविले असून तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे. दोषी ठरविलेल्या सर्वांना 4 एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
मुख्य आरोपी बन्नंजे राजा ऊर्फ बी. आर. ऊर्फ राजेंद्रकुमार (वय 45, रा. बापुथोटा, कडवुरू, माल्पे, जि. उडुपी), आकाश ऊर्फ विवेककुमार उपाध्याय (मृत), जगदीश ऊर्फ सतीशकुमार कटवारपटेल (वय 21, रा. उत्तरप्रदेश), अभी ऊर्फ अंबाजी भीमसा बंडगार (वय 35, रा. अलमेल, जि. विजापूर), गणेश ऊर्फ मंजुनाथ ऊर्फ लक्ष्मण नारायण भट्ट (वय 29, रा. ईडू, ता. कर्कला, जि. उडुपी), के. एम. इस्माईल ऊर्फ मोसा (वय 47, रा. परीलपंचायत ता. जि. पलक्कड, केरळ), महेश ऊर्फ अचंगी महेश बसवणगौडा (वय 34, रा. अचंगी, ता. सखलेशपुरा, जि. हासन), संतोष एम. बी. ऊर्फ सुल्या संतोष बाळगौडा (वय 27, रा. सुल्या, जलमपड्डी, कासरगोड, केरळ), जगदीश चंद्रराज अर्स (वय 42, रा. आरटीनगर, बेंगळूर), अंकितकुमार श्रवणकुमार कश्यप (वय 26, रा. बडेखाजीपूर, तिवारीपूर, उत्तरप्रदेश) अशी दोषींची नावे आहेत.
या खटल्यातून आरोपी क्रमांक 6 रवीन सलीम नागनूर पिचई (वय 40, रा. पुरुर, तामिळनाडू), मोहम्मद रशीद शहाबंदरी ऊर्फ बाबू सादीक अकबर शहाबंदरी (वय 37, रा. मनवारपेठ, बेंगळूर), आनंद रमेश नाईक (वय 42, रा. होनीहळ्ळी, ता. कुमठा, जि. कारवार) यांची ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या खटल्यातील 3 आरोपी मात्र अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. फरारी आरोपींमध्ये नजीम निल्वर ऊर्फ मोहम्मद निल्वर (वय 55, रा. भटकळ, जि. कारवार), हाजी अमीन बाशा ऊर्फ पाशा मोहम्मद (वय 66, रा. विद्यानगर, अत्वार, मंगळूर), सुलेमान ऊर्फ सल्लू ऊर्फ भाया जिन्नुद्दीन (वय 28, रा. यलहंका, सुब्रबन, बेंगळूर) यांचा समावेश आहे.
आर. एन. नायक हे मोठे उद्योजक होते. त्यांच्याकडे बन्नंजे राजाने 3 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे द्या, अन्यथा तुम्हाला संपवू, अशी धमकी दिली होती. नायक यांच्या मुलाला आणि भावालाही त्याने अशीच धमकी दिली होती. त्यानंतर 6 महिन्यांनी उद्योजक आर. एन. नायक यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. त्यांच्यासोबत रमेश लक्ष्मणगौडा नामक गनमॅन ठेवण्यात आला होता. अंकोला (जि. कारवार) येथे बाजारात असलेल्या आपल्या कॉम्प्लेक्समध्ये 21 डिसेंबर 2013 रोजी उद्योजक आर. एन. नायक कामानिमित्त आले होते. काम आटोपून परतत असताना मारुती व्हॅनमधून आलेले आरोपी विवेक व्ही. उपाध्याय (रा. उत्तरप्रदेश), जगदीश पटेल (रा. उत्तरप्रदेश) अभी ऊर्फ अंबाजी बंडगार (रा. विजापूर, सध्या रा. बेंगळूर) आणि गणेश ऊर्फ मंजुनाथ बजंत्री (रा. उडुपी) यांनी त्यांच्यावर गोळय़ा झाडल्या. यात उद्योजक आर. एन. नायक हे गंभीर जखमी झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या गनमॅनने बंदुकीतून गोळय़ा झाडल्या. त्यामध्ये विवेक उपाध्याय हा जागीच ठार झाला होता. मात्र, त्यानंतर गनमॅनने आरोपी जगदीश पटेल याला पकडले. पण इतर दोघांनी संधीचा फायदा घेत व्हॅनमधून पलायन केले होते.
थरारामुळे एकच खळबळ
भरबाजारात घडलेल्या या थरारामुळे एकच खळबळ उडाली होती. गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या उद्योजक आर. एन. नायक यांना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर कारवार पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या जगदीश पटेलची कसून चौकशी केली असता बन्नंजे राजाच्या सांगण्यावरूनच खून केल्याची कबुली त्याने दिली. या प्रकरणात वरील आरोपींबरोबरच के. एम. इस्माईल (रा. केरळ), रबदीन सलीम (रा. केरळ), आचंगी महेश (रा. हासन), संतोष एम. बी. (रा. केरळ), जगदीश चंद्रराज अरस (रा. बेंगळूर), महंमद रशद शहाबंदरी (रा. बेंगळूर), अंकीतकुमार काश्यप (रा. उत्तरप्रदेश) यांचाही समावेश असल्याचे पोलीस तपासातून उघडकीस आले.
या खतरनाक सराईत गुन्हेगाराला आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी बेंगळूर पोलिसांनी केली होती. त्यानुसार त्याला आफ्रिकन पोलिसांनी बेंगळूर पोलिसांच्या स्वाधीन केले. मोरोक्को येथेही त्याने गुन्हा केला होता. मात्र, यावेळी त्याने शिताफीने सुटका करून घेतल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर उडुपी, शिमोगा, मंडय़ा, कारवार, कोडगू, म्हैसूर, बेंगळूर यासह इतर राज्यात गुन्हे दाखल आहेत. 14 ऑगस्ट रोजी बन्नंजे राजाला बेळगावला आणण्यात आले होते. त्याच दिवशी रात्री त्याला कोका न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्याला हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात आले आहे. बन्नंजे राजासह सर्वांवर भा.दं.वि. 302, 307, 353, 108, 120(बी), 212, 201, 419, 468, 471, 384, 388, 504 सहकलम 149 व शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायदा कलम बी, 25 (1), (बी) व कोकांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
न्यायालयात मोठी गर्दी
खळबळजनक खून खटल्याची सुनावणी होणार असल्याने बुधवारी न्यायालयामध्ये मोठी गर्दी झाली होती. वकिलांचा युक्तिवाद ऐकणे तसेच आरोपींना शिक्षा किती होणार याकडे साऱयांचे लक्ष लागून होते. वकिलांबरोबरच पत्रकार आणि वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी मोठी गर्दी केली होती. दुपारी उशिराने या खटल्याचे कामकाज सुरू झाले. त्यामुळे न्यायाधीशांनी केवळ त्यांना दोषी ठरविले असून 4 एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाईल, असे सांगितले.
दीड वर्षांपासून कोका न्यायालयात सुनावणी
गेल्या दीड वर्षांपासून येथील कोका न्यायालयामध्ये या खटल्याची सुनावणी सुरू होती. विशेष सरकारी वकील म्हणून के. जी. पुराणिकमठ यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी न्यायालयामध्ये अनेक साक्षी व पुरावे सादर केले होते. 210 साक्षी आणि 1 हजार 27 कागदपत्रे, 138 मुद्देमाल तपासण्यात आले. यामध्ये हे 9 जण दोषी आढळल्याचे निष्पन्न झाले. या सर्वांना 4 एप्रिलला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
न्यायालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त
खंडणी वसूल करणारी मोठी टोळी असल्याने त्यांना शिक्षा होणे महत्त्वाचे आहे. यासाठी कारवार पोलिसांनीही मोठे कष्ट घेतले आहेत. त्यामुळे कारवारचे वरि÷ पोलीस अधिकारीही उपस्थित होते. याचबरोबर बेळगावमधील पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी व इतर अधिकाऱयांनीही न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
फाशीचीच शिक्षा द्या : के. जी. पुराणिकमठ
न्यायाधीश सी. एम. जोशी यांनी आरोपींना दोषी ठरविल्यानंतर विशेष सरकारी वकील के. जी. पुराणिकमठ व त्यांच्या सहकारी वकिलांनी या 9 जणांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. अटक केल्यानंतरही कारागृहातून खंडणी मागणे तसेच अनेकांना धमकी देणे, असे प्रकार त्यांनी केले आहेत. त्यामुळे समाजामध्ये भीती आहे. तेव्हा त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
तब्बल 18 वर्षे बाहेर राहून पोलिसांना चकवा
खळबळजनक खून प्रकरणानंतर कारवार जिल्हा पोलिसांनी तपास करून या सर्वांना अटक केली. त्यानंतर त्यांच्यावर कोका गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांना हिंडलगा कारागृहात डांबण्यात आले आहे. मात्र, या खून प्रकरणातील मुख्य आरोपी बन्नंजे राजा पोलिसांच्या हाती लागलाच नव्हता. बन्नंजे राजा हा 1998 पासूनच परदेशात राहत होता. तेथूनच तो आपली सूत्रे चालवित होता. तब्बल 18 वर्षे बाहेर राहून त्याने पोलिसांना चकवा दिला होता. याचबरोबर बन्नंजे राजाने दक्षिण आफ्रिकेतील मोरोक्को येथून अनेकांना खंडणीसाठी धमकीचे सूत्र अवलंबिले होते. अत्याधुनिक मोबाईल नेटवर्किंगमधून तो विविध देशांतील उद्योजक व व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकी देत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार इंटरपोलच्या माध्यमातून सापळा रचून आफ्रिकन पोलिसांनी त्याला फेब्रुवारी 2015 मध्ये ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली. त्याच्यावर 40 गुन्हे असून तो सराईत गुन्हेगार आहे, याची माहिती आफ्रिकन पोलिसांनी दिली होती.