प्रताप रेड्डी यांच्यासह इतर अधिकाऱयांनीही नोंदविली साक्ष : बन्नंजेवर आतापर्यंत कर्नाटकात 60 गुन्हे दाखल
प्रतिनिधी /बेळगाव
आंतरराष्ट्रीय गुन्हेगार बन्नंजे राजा उर्फ राजेंद्रकुमार (वय 48) याला कर्नाटक पोलिसांनी 6 ऑगस्ट रोजी आफ्रिकेतील मोरोक्को येथे ताब्यात घेतले होते. 14 ऑगस्ट रोजी विमानाने बन्नंजे राजाला बेळगावला आणण्यात आले होते. त्याचदिवशी रात्री त्याला कोका न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली होती. या खटल्याची सुनावणी येथील मुख्य जिल्हासत्र न्यायालय आणि कोका न्यायालयात सुरू आहे.
त्या ठिकाणी मंगळवारी तत्कालीन उडुपीचे जिल्हा पोलीसप्रमुख आण्णामलाई यांची साक्ष झाली आहे. याचबरोबर पोलीस अधिकारी प्रताप रेड्डी यांच्यासह एडीजीपी यांचीही साक्ष झाली आहे.
बिहार व आंध्रप्रदेशमधील सराईत गुन्हेगारांचा वापर करून बन्नंजेने आर. एन. नायक यांच्यावर गोळीबार केला होता. गोळीबारापूर्वी त्यांना धमकीही दिली होती. यामुळे आर. एन. नायक यांनी आपल्याबरोबर संरक्षकही ठेवला होता. तरीदेखील या सराईत गुन्हेगारांनी त्यांच्यावर गोळीबार करून खून केला होता. या घटनेनंतर बन्नंजे राजा फरार होता. त्याला 12 फेब्रुवारी 2015 रोजी आफ्रिकेतील मोरोको येथे अटक झाली होती. बन्नंजे राजावर कर्नाटकात 44 गुन्हे दाखल झाले होते. युएई आणि मोरोकोतून खंडणीसाठी तो अनेक उद्योजकांना फोन करायचा. फोनवरून तो धमक्या द्यायचा, असे आरोपही त्याच्यावर आहेत.
बन्नंजे राजासह जगदीश पटेल (रा. उत्तरप्रदेश), अंबाजी बंडगार (रा. विजापूर), गणेश बजंत्री (रा. उडुपी), के. एम. इस्माईल, रबदीन सलीम, संतोष सुळय़ा (तिघेही रा. केरळ), अचंगी महेश (रा. हासन), जगदीश रामचंद्र आरस (रा. बेंगळूर), महमद रशद शहाबंद्री (रा. बेंगळूर), अंकितकुमार कश्यप (रा. उत्तरप्रदेश), आनंद नायक आणि के. इस्माईल, जगदीशचंद्र राज अरस यांना अटक केली आहे.
बन्नंजे राजावर कर्नाटकात आतापर्यंत 60 गुन्हे दाखल झाले आहेत. बिहार, उत्तरप्रदेश व महाराष्ट्रातही त्याने गुन्हे घडवून आणले आहेत. राजाविरुद्ध भा.दं.वि. 302, 307, 353, 108, 120(बी), 212, 201, 419, 468, 471, 384, 388, 504 सहकलम 149 व शस्त्रात्र प्रतिबंधक कायदा कलम बी, 25(1),(बी) व कोकांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
आजही आण्णामलाई साक्ष नोंदविणार
परदेशात बसून खंडणीसाठी धमकाविण्याचा प्रकार बन्नंजे राजा करीत होता. खंडणी दिली नाही म्हणून त्याने हस्तकांकरवी अनेकांवर गोळीबार केला आहे. अंकोला येथील अद्योजक आर. एन. नायक यांच्याकडे 3 कोटींची खंडणी मागितली होती. खंडणी दिली नाही म्हणून 21 डिसेंबर 2013 रोजी गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी एकूण 12 जणांचा सहभाग होता. हा खटला अंतिम टप्प्यात असून बुधवारीही आण्णामलाई हे साक्ष नोंदविणार आहेत.
कोका न्यायालयासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त
आण्णामलाई हे आता आंध्रप्रदेशमध्ये भाजप नेते म्हणून कार्यरत आहेत. मात्र त्यावेळी ते पोलीस अधिकारी असल्यामुळे त्यांना या प्रकरणात साक्ष द्यावी लागत आहे. मंगळवारी कोका न्यायालयासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वरिष्ट अधिकारी आल्यामुळे स्थानिक पोलीस अधिकारीही त्या ठिकाणी उपस्थित होते. या खटल्यात ऍड. बी. जे. गंगाई, ऍड. प्रवीण करोशी यांच्यासह बेंगळूर येथील नामांकीत वकीलदेखील संशयित आरोपींचे काम पाहत आहेत.