वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
2022 साली होणारी बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा एका दिवसाने लांबणीवर टाकण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांनी घेतला आहे. या निर्णयामुळे ऍथलिट्सना आपली तंदुरुस्ती राखण्यासाठी जादा कालावधी मिळाला आहे. दरम्यान, विश्व ऍथलेटिक्स स्पर्धा आणि युफाच्या महिला फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे वेळापत्रक एकाचवेळी येऊ नये, याची दखल घेण्यात आली आहे.
2022 च्या बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वेळापत्रकामध्ये किरकोळ बदल करण्यात आला आहे. आता ही स्पर्धा 27 जुलैऐवजी 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान घेतली जाणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा फेडरेशनच्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये या नव्या निर्णयाला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेतील ओरेगॉन येथे 15 ते 24 जुलै दरम्यान विश्व ऍथलेटिक्स स्पर्धा त्याचप्रमाणे इंग्लंडमध्ये 6 ते 31 जुलै दरम्यान युफा महिलांची फुटबॉल स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या दोन्ही स्पर्धा यापूर्वी 2021 साली घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण कोरोना महामारी संकटामुळे सदर स्पर्धा एक वर्षासाठी म्हणजेच 2022 साली घेण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर विश्व ऍथलेटिक्स स्पर्धा आणि युफाच्या महिला फुटबॉल स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱया ऍथलिट्सना आपली शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी आणखी दोन आठवडय़ांचा कालावधी मिळाला आहे. राष्ट्रकुल क्रीडा फेडरेशन आणि बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धा आयोजकांनी संयुक्तपणे ही घोषणा केली आहे. उन्हाळी क्रीडा मोसमातील 2022 ची बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धा ही महत्त्वाची राहील. ब्रिटनमध्ये सदर स्पर्धा होत असल्याने शौकिनांचा अधिक प्रतिसाद या स्पर्धेला लाभेल. इंग्लंडमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि युफाची महिलांची फुटबॉल स्पर्धा पाठोपाठ होत असल्याने क्रीडा शौकिनांना ही मेजवानीच ठरणार आहे, अशी माहिती विश्व ऍथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष सेबेस्टिन को यांनी दिली.