वृत्तसंस्था/ लंडन
2022 साली बर्मिंगहॅम शहरात होणाऱया राष्ट्रकुल स्पर्धेच्या बॅटन रिलेचे उद्घाटन राणी एलिझाबेथ -2 यांच्या हस्ते गुरुवारी येथे मोठय़ा थाटात करण्यात आले. 95 वर्षीय राणी एलिझाबेथ यांच्या हस्ते राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या रिले बॅटन पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत चारवेळा सुवर्णपदक मिळविणाऱया कॅडीना कॉक्सकडे सुपूर्द केला.
गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोना महामारीमुळे राणी एलिझाबेथ यांच्या बकांमहॅम पॅलेसच्या परिसरात एकही समारंभ आयोजित केला नव्हता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही जागतिक मैत्रीचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. इंग्लंडची 30 वर्षीय पॅरा ऍथलिट कॅडीना कॉक्सने अलिकडेच झालेल्या टोकियोतील पॅराऑलिम्पिकमध्ये 2 सुवर्णपदकांची कमाई केली होती. यापूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेकडे केवळ राजेशाही स्पर्धा म्हणून पाहिले जात होते. सदर स्पर्धा प्रत्येक चार वर्षांनी घेतली जाते. 2022 च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या बॅटन रिलेचा प्रवास संपूर्ण जगामध्ये सुमारे 90,000 मैलांचा राहिल. सदर बॅटन रिले जगातील 72 देशामधून 294 दिवसांच्या कालावधीत प्रवास करणार असून 28 जुलैला बॅटनचे आगमन बर्मिंगहॅममध्ये होईल. गुरुवारी बॅटन रिलेच्या उद्घाटन समारंभाला इंग्लंडच्या क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच पंतप्रधान बोरीस जॉन्सन उपस्थित होते.