हैदराबाद पोलिसांवर चालणार हत्या केल्याचे प्रकरण
हैदराबाद / वृत्तसंस्था
डिसेंबर 2019 मध्ये हैदराबाद येथे एका युवतीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा आरोप असणाऱया चार संशयितांचा करण्यात आलेला एन्काऊंटर बनावट होता, असा निष्कर्ष या प्रकरणी नेमलेल्या चौकशी आयोगाने काढला आहे. त्यामुळे हा एन्काऊंटर करणाऱया पोलिसांवर हत्येचा गुन्हा नोंद केला जाणार आहे.
27 नोव्हेंबर 2019 या दिवशी हैदराबाद येथे प्राण्याची डॉक्टर असणाऱया एका युवतीवर चार जणांनी सामुहिक बलात्कार करुन तिची जाळून निर्घूण हत्या केली होती. तिचा मृतदेह दुसऱया दिवशी पोलिसांना सापडला होता. त्यानंतर त्वरित मोहम्मद अरीफ, चिंताकुंटा चन्नकेशवलू, जोलू शिवा आणि जोलू नवीन या चार आरोपींना अटक करण्यात आली होती. नंतर पोलिसांनी त्यांचा एन्काऊंटर केला.
बनावट एन्काऊंटर
दोन आरोपींनी पोलिसांवर चिखल फेकला आणि त्यांच्या हातातील शस्त्रे खेचली आणि पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांना स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागला आणि त्यात चारही आरोपी ठार झाले, असे पोलिसांचे म्हणणे होते. या एन्काऊंटरची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यांचा आयोग नेमण्यात आला होता. पोलिसांनी या आरोपींवर गोळीबार करावा लागल्याची जी कारणे स्पष्ट केली होती, ती बनावट असल्याचे आयोगाच्या तपासात आढळले होते. पोलिसांनी आरोपींना ठार करण्यासाठीच गोळीबार केला. गोळीबारातून आरोपी वाचणार नाहीत, हे पोलिसांना माहित असूनही त्यांनी हा एन्काऊंटर घडविला असे प्रतिपादन आयोगाने आपल्या 387 पृष्ठांच्या अहवालात केले आहे.
पुरावा दडवून ठेवला
हा एन्काऊंटर कसा झाला याचे पुरावे आयोगापासून दडवून ठेवण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फूटेज, गोळीबार झाला ती जागा आणि इतर बाबींचा सुगावा आयोगाला लागू नये अशी व्यवस्था करुन धूळफेक करण्यात आली होती, असे तपासात निष्पन्न झाले असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या आरोपींना पकडताना योग्य प्रक्रिया उपयोगात आणली गेली नव्हती. ज्या न्यायदंडाधिकाऱयाने या आरोपींची कोठडी पोलिसांना दिली, त्यानेही प्रक्रियेचे यथायोग्य पालन केले नव्हते. योग्य ती कागदपत्रे न पाहताच त्यांना कोठडी देण्यात आली होती, अशी अनेक निरीक्षणे अहवालात नोंदविण्यात आली आहेत.
सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाकडे
हा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला पाठविण्यात आला होता. आता सर्वोच्च न्यायालयाकडून तो उच्च न्यायालयात पाठविण्यात आला असून तो उच्च न्यायालयाच्या माध्यमातून या प्रकरणातील सर्व पक्षकारांना मिळणार आहे. तसेच आता या एन्काऊंटरला जबाबदार असणाऱया अधिकाऱयांवर कारवाई होणार आहे.