पोलिसांची विचारणा, आरटीओ अधिकारी चक्रावले
वृत्तसंस्था / वडोदरा
गुजरातमधील वडोदरा पोलीस सध्या एका बलात्काराच्या गुन्हय़ाची चौकशी करत असून त्यांनी आरोपीला अटक केली आहे. मात्र त्याच्याविरोधातील खटला अधिक मज्बूत करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस पुरावे जमवू पाहत आहेत. पण याचदरम्यान पोलिसांनी स्थानिक आरटीओकडे (प्रादेशिक परिवहन कार्यालय) वेगळीच विचारणा केली आहे. पोलिसांच्या या विचारणेनंतर आरटीओचे अधिकारी चक्रावले आहेत. बलात्काराचा गुन्हा टोयोटा फॉर्च्युनर एसयुव्ही कारमध्ये घडला होता, त्या कारमध्ये बलात्कार करण्याइतकी जागा असते का अशी विचारणा पोलिसांनी केली आहे. आरटीओकडून तज्ञ अहवालच पोलिसांनी मागविला आहे.
आरोपी भावेश पटेल आणि पीडित तरुणी एका त्रयस्थ मित्राच्या ओळखीने संपर्कात आले. पीडित युवती 26 एप्रिल रोजी एका फार्महाउसवर पार्टीसाठी गेली होती. मात्र रात्री पोलिसांचे गस्त पथक तेथे पोहोचल्यावर सदर युवती लपून बसली आणि तिने मित्राला फोन करून तेथून नेण्यास बोलाविले. मित्राने भावेश पटेलला फोन करून तिला घेण्यासाठी पाठविले. भावेशने पीडितेला एका एसयुव्ही कारमधून नेत अज्ञात स्थळी तिच्यावर कारमध्येच बलात्कार केला आणि त्यानंतर आरोपीने तरुणीला घरी सोडल्याची तक्रार आहे.
एसयुव्ही कार ताब्यात
या गुन्हय़ात वापरण्यात आलेली एसयुव्ही कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. कारची पुढची सीट पुशबॅक केल्यावर तयार होणाऱया लेगस्पेसमध्ये बलात्कार होऊ शकतो, अशी विचारणा गुन्हे अन्वेषण विभागाने आरटीआकडे केली आहे. तसेच कार सेंटर लॉक असल्यास चालकाच्या व्यतिरिक्त अन्य कुणी दरवाजे उघडू शकतं का असेही विचारण्यात आले आहे. आरटीओ केवळ तांत्रिक माहिती देऊ शवपे, संबंधित गुन्हा कारमधील तितक्या जागेत घडला होता की नाही हे सांगू शकत नसल्याचे आरटीओमधील एका अधिकाऱयाने म्हटले आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाची भूमिका
हा खटला पीडितेच्या तक्रारीवर आधारित आहे. तिला पुरावाजन्य आधार देण्यासाठी वाहनासंबंधी माहिती गरजेची आहे. संबंधित कारमधील पुढच्या सीटच्या लेग स्पेसमध्ये बलात्काराचा गुन्हा होऊ शकतो हे सिद्ध करण्यासाठी ही माहिती आवश्यक आहे. आरोपी भावेश पटेल आणि पीडितेची उंची देखील मोजली असून आरटीओकडून मिळणाऱया माहितीसोबत पडताळून पाहणार आहोत असे विधान गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दिवानसिंग वाला यांनी केले आहे.