अश्लिल फोटो नातेवाईकांना दाखवण्याची धमकी
प्रतिनिधी/ सातारा
सातारा तालुक्यातील एका गावातील महिलेशी शारीरीक संबंध ठेवून त्याचे फोटो काढून ते महिलेच्या पती, मुलगा, नातेवाईकांना दाखवण्याची धमकी देत वारंवार बलात्कार करुन महिलेला दोन लाख रुपयांचा गंडा घालणाऱया स्वरुप महादेव गुजर (वय 50, रा. हिरण्या प्राईड अपार्टमेंट, तामजाईनगर, सातारा) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2018 ते 21 मे 2021 या कालावधीत स्वरुप महादेव गुजर याने हा प्रकार केला आहे. पिडीत महिलेशी शारीरिक संबंधाचे फोटो त्याने काढले. नंतर या कालावधीत सातत्याने हे फोटो तिच्या पती, मुलगा, नातेवाईकांना दाखवण्याची धमकी देत वांरवार तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवले.
संबंधास नकार दिल्यानंतर गुजर याने महिलेच्या गळय़ाला चाकू लावून तिच्याकडून बँकेचा एटीएमचा पिन क्रमांक घेवून तिच्या बँक खात्यातून 1 लाख 50 हजार रुपये काढून घेतले व त्यानंतर आणखी असे 2 लाख रुपये धमकी देवून काढून घेतले असल्याचे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी स्वरुप गुजर याला अटक करण्यात आली असून या गुन्हय़ाचा अधिक तपास उपनिरीक्षक ए. बी. वाघमारे करत आहेत.