बेंगळूर/प्रतिनिधी
देशात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना कर्नाटकातील काही महिला आमदारांनी विधानसभेत (karnataka assembly) आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, कर्नाटकातही वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांवर विधानसभेत चर्चा सुरु असताना काही महिला आमदारांनी यावर संताप व्यक्त केला. बलात्काऱ्याचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी सरकारने पाऊले उचलावीत अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान महाराष्ट्रातील साकीनाका, डोंबिवली असो वा कर्नाटकातील म्हैसूर असो, देशातील महिलांवरील अत्याचार सुरूच आहेत. गुन्हेगारांना कायद्याची कोणतीही भीती राहिली नसून त्यामुळे महिलांच्या, अगदी अल्पवयीन मुलींच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच विषयावर कर्नाटक विधानसभेत चर्चा सुरु असताना महिला आमदारांच्या असंतोषाला वाचा फुटली. बलात्काऱ्याला कायद्याने सामान्य शिक्षा न देता त्याचे गुप्तांग छाटावे, त्याचे सार्वजनिकरित्या खच्चीकरण करावं, इतकंच नव्हे तर बलात्काऱ्याचे तेलंगणाच्या धर्तीवर एन्काऊंटर करावे अशी मागणी त्यांनी केली.
म्हैसूरमध्ये नुकतंच एका महिलेवर सामूहिक बलात्काराची (Rape) घटना घडली. गेल्या१५ दिवसातील ही दुसरी बलात्काराची घटना आहे. त्यामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं. याच विषयावर शुक्रवारी कर्नाटक विधानसभेमध्ये चर्चा सुरु झाली. यावेळी महिलांच्या प्रश्नावर सातत्याने आक्रमक भूमिका मांडणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील खानापूर (Khanapur) या मराठी भाषिक मतदारसंघाच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर (MLA Anjali Nimbalkar) यांनी या प्रश्नी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. त्यांनी “स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराला स्त्रीलाच जबाबदार धरलं जातं आणि अत्याचार करणारा राजरोस ताठ मानेनं समाजात वावरतो. एक स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून आपण स्वत: बलात्कारीत महिला आणि मुलींचं दु:ख अनेकदा पाहिलं आहे. त्यामुळे बलात्काऱ्याला सामान्य शिक्षा न देता त्याचे गुप्तांग छाटावे, त्याला आयुष्यभर मानसिक त्रास होईल, त्याचे खच्चीकरण होईल अशी शिक्षा द्यावी.”
आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी, “सामान्य शिक्षेमुळे गुन्हेगारांवर फारसा परिणाम होत नाही. तो बलात्कारी व्यक्ती विना वेदना मरुन जाईल. त्यामुळे त्याचे गुप्तांग छाटावे. असं केल्यास त्या बलात्काऱ्याला रोज त्याच्या कृत्याची आठवण राहिल. पीडितेने अनुभवलेल्या वेदना त्यालाही अनुभवता येतील आणि त्याचे मानसिक खच्चीकरण होईल,” असे म्हंटले.
आमदार विनिशा नेरो (MLA Vinisha Nero) म्हणाल्या की, “बलात्काऱ्याचे पोस्टर्स सर्वत्र झळकायला हवेत, अशा लोकांची पोलिसांनी सार्वजनिक वरात काढली पाहिजे. त्यामुळे बलात्काऱ्याला थोडी तरी शरम वाटेल.” तर मदार रुपा शशिधर (MLA Roopa Shashidhar) म्हणाल्या की, “समाजाने महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. न्याय प्रक्रियेतील होणाऱ्या विलंबामुळे महिला त्यांच्यावर झालेल्या अत्याचाऱ्याची तक्रार द्यायला पुढे येत नाहीत.”
डोंबिवली बलात्कार प्रकरण काय आहे वाचा सविस्तर