ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात मोठा दहशतवादी हल्ला झाला असून, या हल्ल्यात पाकचे 10 सैनिक मारले गेले. पाकिस्तानी सैन्याच्या मीडियाने (आयएसपीआर) यासंदर्भात माहिती दिली आहे.
आयएसपीआरने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील केच जिल्ह्यात 25-26 जानेवारीच्या मध्यरात्री हा हल्ला झाला. सुरक्षा दलाच्या एका चेक पोस्टला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. या हल्ल्यात दहा जवान मारले गेले. लष्कराच्या प्रत्युत्तरात एक दहशतवादी मारला गेला असून, काही जण जखमी झाले. या कारवाईत पाक लष्कराने तीन दहशतवाद्यांना पकडले आहे.
या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून जागोजागी अर्लट जारी करण्यात आले आहेत. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारलेली नाही.