कॅनडात आढळल्या मृतावस्थेत, पाकिस्तानच्या घातपातची शक्यता
टोरँटो / वृत्तसंस्था
बलुचिस्तानला पाकिस्तानपासून मुक्त करण्यासाठी चालविण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या नेत्या करीमा बलोच यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह कॅनडाच्या या राजधानीच्या शहरात आढळून आला. त्या रविवारी रात्री 3 वाजल्यापासून बेपत्ता होत्या. टोरँटो पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. 2016 मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘रक्षाबंधन संदेश’ पाठविला होता. तसेच भारताने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढय़ात सहकार्य करावे असे आवाहन केले होते.
त्यांची हत्या पाकिस्तानी हस्तकांनी घडवून आणली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. त्या दिशेने तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बलोच यांनी पाकिस्तानी सरकार आणि पाक लष्कर यांच्याकडून बलुची नागरीकांवर होत असलेल्या अत्याचारांवर आणि निरपराध बलुची नागरीकांच्या हत्यांवर जागतिक पातळीवर आवाज उठविला होता. त्यामुळे पाकिस्तानी हस्तक त्यांच्या मागावर होते. टोरँटो प्रशासनाने त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था केली होती. तथापि, अखेर पाकिस्तानच्या मारेकऱयांना त्यांच्यापर्यंत पोहचले, असे कॅनडातील अनेक पत्रकारांनी स्पष्ट केले आहे. त्या 2016 मध्ये पाकमधून कॅनडात पोहचल्या होत्या. बलुचिस्तान राष्ट्रीय चळवळीच्या त्या प्रवक्त्या होत्या. त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघातही उपस्थित केला होता. त्यांचे हौतात्म्य आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील, अशी प्रतिक्रिया बलोच राष्ट्रीय आंदोलनाचे अनेक नेते व कार्यकर्त्यांनी मंगळवारी व्यक्त केली आहे.
तलावाशेजारी मृतदेह बलोच यांचा मृतदेह टोरँटोनजीक हार्बरप्रंट येथील एका तलावानजीक मंगळवारी आढळून आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यांचे पती हमाल हैदर आणि बंधू यांनी त्यांचा मृतदेह ओळखला. मृतदेह पोलिसांच्याच ताब्यात असून उत्तरीय तपासणीनंतर मृत्यू कसा झाला ते कळू शकणार आहे. घातपाताची शक्यता गृहित धरून पुढील तपास सुरू आहे अशीही माहिती देण्यात आली.