नोव्हेंबर 2018 ला गाठला पाच लाखांचा टप्पा
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार निर्मिती कंपनी मारुती सुझुकी इंडियाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या ‘बलेनो प्रीमियम हॅचबॅक’ या मॉडेलने 10 लाख युनिटचा एकूण विक्रीचा टप्पा प्राप्त केला आहे. कंपनीने ऑक्टोबर 2015 मध्ये या मॉडेलचे लाँचिंग केले होते. या अगोदर नोव्हेंबर 2018 मध्ये 5 लाख विक्रीचा टप्पा प्राप्त केल्याची नोंद आहे.
प्रिमियम नेक्सा शोरूमच्या माध्यमातून विक्री करण्यात आलेले बलेनोचे मॉडेल 2015 मध्ये चांगलेच चर्चेत आले होते. दुसऱया बाजूला चालू वर्षातील नोव्हेंबरमध्ये विक्रीचा टप्पा हा 10 लाखाच्या घरात पोहोचला असल्याची माहिती आहे.
25 टक्के बाजारात हिस्सेदारी
बलेनो प्रीमियम हॅचबॅक वर्गातील सर्वात पुढे असणाऱया मॉडेलसोबत कंपनीचा हिस्सा हा 25 टक्के बाजारात राहिला आहे. यासह भविष्यात आणखीन नवी उंची प्राप्त करणार असल्याचा विश्वास कंपनीचे कार्यकारी संचालक(विपणन व विक्री ) शशांक श्रीवास्तव यांनी व्यक्त केला आहे.