प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील बसथांब्यांची अधिकाऱयांकडून पाहणी सुरू झाल्यानंतर बसथांबे चकचकीत करण्यात येऊ लागले आहेत. मात्र, बसथांब्यांची स्वच्छता झाली तरी परिसरातील कचऱयाचे साम्राज्य तसेच आहे.
युनियन जिमखान्यानजीक असणाऱया बसथांब्यामध्ये प्रचंड प्रमाणात कचरा साचला होता. त्याबद्दल सोशल मीडियावर फोटो व्हायरल होऊ लागले तसे लगेचच बसथांबे स्वच्छ झाले. जिमखान्यासमोर असणाऱया बसथांब्याच्या नजीकचा कचरा गुरुवारी सकाळी उचलला गेला. परंतु त्याच्याच पुढे असणाऱया गोगटे रंग मंदिरानजीकचा कचरा तसाच पडून आहे.
शहरातील कचऱयाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. परंतु कचरा उचलण्याचे व्यवस्थापन नाही. त्यामुळे एका ठिकाणचा कचरा उचलेपर्यंत दुसऱया ठिकाणी कचरा साचलेलाच असतो. नागरिकही या समस्येला वैतागले असून, कचरा टाकण्यासाठी कोणतीही सोय नाही. वेळेवर त्याची उचल नाही, या कारणास्तव रात्रीच्या वेळी मोकळय़ा जागी कचरा आणून टाकत आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत बसथांबे स्मार्ट करण्यात येत असले तरी जोपर्यंत कचरा आणि मोकाट जनावरे यांच्यापासून ते मुक्त होणार नाहीत तोवर ही समस्या कायम राहणार आहे.