युनियन जिमखान्यासमोर असलेल्या बसथांब्याच्या विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष : शेडची दुरवस्था, आसनांची दुर्दशा
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध बसथांब्यांचा विकास करण्यात आला असून काही ठिकाणी दोन बसथांब्यांचे शेड निर्माण करण्यात आले आहेत. पण युनियन जिमखाना परिसरात असलेल्या बसथांब्यावर मोठय़ाप्रमाणात प्रवाशांची गर्दी असूनही बसथांब्याचा विकास करण्यात आला नाही. येथील बसथांब्यांची दुरवस्था झाली असून बसथांबा अपुरा पडतो. त्यामुळे बसथांब्यांच्या विकासाकडे लक्ष देतील का? अशी विचारणा होत आहे.
स्मार्टसिटी योजनेअंतर्गत विविध बसथांब्यांचा विकास करण्यात आला. पण युनियन जिमखाना समोर असलेल्या बसथांब्यांच्या विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. शहराच्या पश्चिम भागातील असंख्य गावांना जाणारे प्रवासी या बसथांब्यांवर थांबतात. याठिकाणी जुना बसथांबा असून बसथांब्याचे छत खराब झाले आहे. बसथांब्यांची दुरवस्था झाली असून बसण्यासाठी आसनव्यवस्था नसल्याने प्रवाशांना थांबून रहावे लागते. बस वेळेत येत नसल्याने प्रवाशांना तासन्तास थांबावे लागते. मात्र बसण्यासाठी आसन नसल्याने गैरसोय होत आहे. अन्य बसथांब्यांप्रमाणे या बसथांब्यांचा विकास करून आसनव्यवस्था तसेच शेडची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. तसेच बसथांब्यावर वडाप वाहनधारकांची गर्दी होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषतः विद्यार्थी आणि महिला व वृद्ध नागरिकांची गैरसोय होत असल्याने या बसथांब्यांचा विकास करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
नवीन बसथांबा उभारावा
तसेच या परिसरात राकसकोप परिसरात जाणाऱया बसप्रवाशांसाठी बसथांबा नसल्याने झाडाखाली थांबावे लागते. याठिकाणी नवीन बसथांबा उभारण्यात यावा, अशी मागणी सातत्याने केली जाते. पण याची दखल घेतली जात नाही. ऊन-पावसात प्रवाशांना थांबावे लागत असल्याने याठिकाणी बसथांबा उभारण्यात यावा, अशी मागणी होत आहे.