ट्रुजेटने सुरू केला ख्रिसमस सेल
प्रतिनिधी/ बेळगाव
बसप्रवासापेक्षाही कमी किंमतीत विमानप्रवास करण्याची संधी बेळगावच्या प्रवाशांना मिळत आहे. ट्रुजेट कंपनीने ख्रिसमसासाठी विशेष सेल घोषित केला आहे. यामुळे प्रवाशांना खासगी आरामबस तिकीटाच्या रकमेत विमानप्रवास करता येणार आहे. बेळगावमधून दररोज 4 शहरांना थेट विमानसेवा ट्रुजेट देत असल्यामुळे बेळगावच्या प्रवासी संख्येत निश्चितच वाढ होणार आहे.
लॉकडाऊन खुले झाल्यानंतर कोरोनाची असल्याने तितक्याशा प्रमाणात विमान प्रवासी नव्हते. परंतु कोरोनाचे संकट आता काहीसे दूर झाल्यामुळे हळूहळू प्रवासी संख्येत वाढ होत आहे. अधिकाधिक प्रवासी प्रवास करावेत यासाठी तिकीट दरही कंपन्यांनी कमी करण्यात आले होते. आता काही कंपन्यांनी प्रवासी वाढविण्यासाठी सेल देखील सुरू करून अत्यंत कमी दराने विमानप्रवासाची संधी उपलब्ध करून दिली आहे.
ट्रुजेट कंपनीने 11 ते 17 डिसेंबर दरम्यान बुकिंग करणाऱया ग्राहकांना ही सुविधा दिली आहे. या प्रवाशांना 11 डिसेंबर ते 30 ऑक्टोबर 21 पर्यंत काही ठराविक दिवशी कमी किंमतीत प्रवास करता येणार आहे. बेळगावमधून अवघ्या 839 (अधिक विविध कर) रूपयांमध्ये म्हैसूर, हैद्राबाद, कडाप्पा व तिरूपती या शहरांना जाता येणार आहे. त्यामुळे ज्यांनी बाहेर जाण्याचा प्लॅन केला आहे, त्यांना या सेलचा फायदा होणार आहे.
अलायन्स एअरच्या बेंगळूर फेरीला उत्तम प्रतिसाद
अलायन्स एअरच्या बेंगळूर व पुणे या दोन्ही फेऱयांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तीन तास प्रवासाला विलंब झाला. परंतु त्यानंतर अलायन्स एअरने सुरळीत विमानसेवा सुरू केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रवासी बेळगाव – बेंगळूर – बेळगाव व पुणे – बेळगाव – पुणे या दोन्ही विमानसेवांना उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे.