मायावतींची घोषणा – भाजप अन् समाजवादी पक्षावर केले आरोप
वृत्तसंस्था / लखनौ
उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणूक नजीक आल्याने बसप अध्यक्षा मायावतींनी आता अन्य राजकीय पक्षांवरील शाब्दिक हल्ले वाढविले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत बसप स्वबळावर मैदानात उतरणार असल्याची घोषणा त्यांनी मंगळवारी केली आहे.
निवडणुकीत कुठल्याही पक्षासोबत आघाडी करणार नाही. आम्ही समाजवादी पक्ष आणि भाजपमध्ये कुठलाच फरक नसल्याचे मानतो. हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही पक्ष निवडणुकीला हिंदू-मुस्लीम रंग देऊ पाहत आहेत. 2007 मध्ये ज्याप्रकारे बसपला पूर्ण बहुमत मिळाले होते, त्याचप्रकारे यंदाही आम्ही सत्तेवर येणार आहोत, असे म्हणत मायावतींनी बसपच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न चालविला आहे.
दरकपातीमागे निवडणूक
इंधनावरील विविध शुल्क कमी करण्यामागे आगामी विधानसभा निवडणूक कारणीभूत आहे. निवडणुकीत स्वतःच्या पराभवाच्या भीतीने भाजपने इंधनाच्या दरांमध्ये कपात केली आहे. उत्तरप्रदेशात स्वतःच्या सरकारच्या अपयशाला लपविण्यासाठी आणि लक्ष विचलित करण्यासाठी भाजपने समाजवादी पक्षासोबत हातमिळवणी केली आहे. हे दोन्ही पक्ष संगनमत करून जिन्ना आणि अयोध्या पोलीस गोळीबार यासारखे जुने सांप्रदायिक आणि धार्मिक मुद्दे उकरून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे मायावती म्हणाल्या.
स्वार्थाचे राजकारण उघड
सप आणि भाजपचे स्वार्थाचे राजकारण पुन्हा उघड झाले आहे. या दोन्ही पक्षांची विचारसरणी जातीयवादी आणि सांप्रदायिक असल्याने त्यांचे अस्तित्व परस्परांना पूरक राहिले आहे. याचमुळे समाजवादी पक्ष सत्तेवर असताना भाजप मजबूत होतो. तर बसप सत्तेवर आल्यास भाजप कमकुवत होतो. राज्यातील जनता आता त्यांच्या कटाला बळी पडणार नसल्याचा दावा मायावती यांनी केला आहे.