बसमध्ये चढण्यासाठी चढाओढ, परिवहनचे दुर्लक्ष : कोरोना नियमांचे उल्लंघन
प्रतिनिधी /बेळगाव
एकीकडे परिवहनकडून कोरोनाचे नियम पाळून प्रवास करावा, असे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे परिवहन मंडळाकडूनच कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडताना दिसत आहे. प्रशासनाने बऱयाच गोष्टींवरील निर्बंध शिथिल केल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र याठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. याकरिता परिवहनने बसफेरींची संख्या वाढवून प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करावा, अशी मागणी होत आहे.
परिवहनची बससेवा विविध ठिकाणी धावत असल्याने प्रवाशांची संख्या समाधानकारक वाढत आहे. बसमध्ये आसन क्षमतेच्या 50 टक्केच प्रवाशांनी प्रवास करावा, अशी नियमावली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून बसमध्ये गर्दी वाढत आहे. त्यामुळे बसमधील वाढती गर्दी चिंताजनक ठरत आहे.
शाळा-कॉलेज पूर्णवेळ सुरू झाली आहेत. तसेच नवरात्रोत्सव तेंडावर आल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र बसस्थानकात कोरोना नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. बसस्थानकात कोणतीही बंधने नसल्याने प्रवासी गर्दी करत आहेत. तसेच थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर व सामाजिक अंतर याकडे दुर्लक्ष करून प्रवासी बसमध्ये जागा मिळविण्यासाठी चढाओढ करताना दिसत आहेत.
कोरोना नियमावलींना हरताळ
बसस्थानकात कोरोनासंबंधीच्या कोणत्याही नियमावलींचे पालन होताना दिसत नाही. बसस्थानक पूर्ववत प्रवाशांनी गजबजू लागले आहे. मात्र याठिकाणी सामाजिक अंतर व थर्मल स्कॅनिंग करण्यासाठी परिवहन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर विविध ठिकाणी जाणाऱया प्रवाशांची झुंबड उडत आहे. परिवहनने बसस्थानकात कोरोना नियमांचे पालन व्हावे, याकरिता सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.