डॉ. तोंटद सिद्धराम स्वामीजींचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. तर देश लॉकडाऊनमध्ये आहे. त्याला कर्नाटकही अपवाद नाही. अशा परिस्थितीत जगद्ज्योती महामानवतावादी बसवेश्वरांची जयंती साजरी करणे शक्मय नाही आणि योग्यही ठरणार नाही. म्हणून घरातच बसवजयंती साजरी करावी, असे आवाहन डॉ. तोंटद सिद्धराम स्वामीजींनी केले आहे.
यासंबंधी डंबळ-गदग तोंटदार्य संस्थान मठाचे जगद्गुरू डॉ. तोंटद सिद्धराम स्वामीजींनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. यंदाची बसवजयंती आपापल्या घरातच भक्तीभावाने व श्रद्धेने साजरी करावी. बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून वचनपठण करावे. ‘श्रीगुरु बसवलिंगाय नम:’ या मंत्रघोष करावा, असे आवाहन स्वामीजींनी केले आहे.
घरात बसवजयंती साजरी करताना वचनसंगीत, वचनचिंतनावर भर द्यावा. कोरोना महामारीपासून सकल प्राणीमात्रांचे संरक्षण करावे, यासाठी महात्मा बसवेश्वरांकडे प्रार्थना करावी. संकटाच्या काळात प्रत्येकाने आपापल्या घरातच रहावे तरच कोरोना थोपविणे शक्मय होणार आहे, असा सल्लाही स्वामीजींनी दिला आहे.