साडेपाच लाखांचा ऐवज पळविला
प्रतिनिधी/ बेळगाव
शहर व उपनगरांमध्ये चोऱया, घरफोडय़ा वाढल्या आहेत. देवराज अर्स कॉलनी, बसवण कुडची व रामतीर्थनगर येथे दोन बंद घरे फोडून सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज पळविण्यात आला आहे. शुक्रवारी या घटना उघडकीस आल्या आहेत.
माळमारुती पोलीस स्थानकात या दोन्ही चोरी प्रकरणांची नोंद झाली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले.
देवराज अर्स कॉलनी, बसवण कुडची येथील टॅम्पटू मूल्या यांच्या घरी चोरीचा प्रकार घडला आहे. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता आपल्या घराला कुलूप लावून टॅम्पटू व त्यांची पत्नी यशोदा कडोलकर गल्ली येथील दुकानाला गेले. सायंकाळी चार वाजता घरी परतले त्यावेळी दर्शनी व पाठीमागील दरवाजे उघडे होते. त्यामुळे चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरटय़ांनी कपाट फोडून 4 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने पळविले आहेत. शुक्रवारी यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना रामतीर्थनगर येथील शिवरुद्र कांबळे यांच्या घरी घडली आहे. 12 नोव्हेंबर रोजी आपल्या घराला कुलूप लावून ते गावी गेले होते. शुक्रवारी सकाळी शेजाऱयांनी फोन करून तुमच्या घरात चोरी झाली आहे, अशी माहिती दिल्यानंतर ते गावातून रामतीर्थनगरला परतले. कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी 1 लाख 30 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने पळविल्याचे उघडकीस आले आहे. माळमारुती पोलीस पुढील तपास करीत आहेत.