अडीच तासांत चोरटय़ांनी साधला डाव : माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
केएचबी कॉलनी, बसवनकुडची येथे भरदिवसा पाच लाखांची घरफोडी झाली आहे. मंगळवारी सायंकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. केवळ अडीच तासांत चोरटय़ांनी एका शिक्षिकेच्या घरातील सुमारे 5 लाखांचे दागिने पळविले आहेत. शहर व उपनगरांत चोऱया, घरफोडय़ा वाढल्या आहेत.
यासंबंधी सरला सुभाष नेसरगी यांनी मंगळवारी रात्री माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक व्हन्नाप्पा तळवार व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले.
सरला या शिक्षिका आहेत. कामावरून रामदेव जवळ आलेल्या आपल्या आईला आणण्यासाठी सरला यांचा मुलगा दुपारी 4 वाजता घराला कुलूप लावून घराबाहेर पडला होता. आईला घेतल्यानंतर हे दोघे बाजारात गेले. त्यानंतर बाजारपेठेतील कामे आटोपून 6.30 वाजता घरी परतले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला.
दुपारी 4 ते सायंकाळी 6.30 या केवळ अडीच तासांत चोरटय़ांनी शिक्षिकेच्या बंद घराचे कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केल्याचे उघडकीस आले आहे. बेडरूममध्ये ठेवलेले पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद सरला यांनी दिली आहे. माळमारुती पोलीस पुढील तपास करीत आहेत.