बसवराज बोम्माई यांनी राज्याचे 23 वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ
बेंगळूर/प्रतिनिधी
बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, मंगळवारी बेंगळूर येथील एका खासगी हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीनंतर बोम्माई यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आले.
बसवराज बोम्माई यांनी आज ११ वाजता मुख्यमंत्री पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी त्यांना शपथ दिली. शपथविधी दरम्यान माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा उपस्थित होते. या बरोबरच भाजपाचे इतर अनेक बडे केंद्रीय व राज्य ज्येष्ठ नेतेही या कार्यक्रमात उपस्थित होते. बोम्माई कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री असणार आहेत.
कोण आहेत बसवराज बोम्माई?
बसवराज बोम्माई यांची मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. आज बोम्माई यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, येडियुरप्पांप्रमाणेच बसवराज बोम्माई हे देखील लिंगायत समाजाचे नेते असून ते येडियुरप्पांचेच निकटवर्तीय मानले जातात. ६१ वर्षीय बसवराज बोम्माई यांनी आत्तापर्यंत गृहविभाग, कायदे विभाग, सांस्कृतिक कार्यमंत्रीपद अशा अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी आत्तापर्यंत पार पाडली. मंगळवारी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी बोम्माई यांनी भाजपचे केंद्रीय निरीक्षक धर्मेंद्र प्रधान, जी. किशन रेड्डी आणि अर्जुन सिंह यांची बेंगळूरमध्ये भेट घेतली. याशिवाय, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी पक्षाच्या ४० आमदारांनी देखील त्यांची भेट घेतल्याचं देखील सांगितलं जात आहे.