बेंगळूर/प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या चर्चेवर अखेर मंगळवारी पडदा पडला. कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर भाजपाच्या दिल्लीतील नेतेमंडळींकडून दबाव असल्याच्या अनेक चर्चा या काळात रंगल्या. मात्र, आपल्यावर कोणताही दबाव नसून स्वेच्छेने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं येडियुरप्पांनी सोमवारी स्पष्ट केलं. त्यानुसार मंगळवारी नवीन मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई यांच्या नावावर पक्षानं शिक्कामोर्तब केलं. पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी बसवराज बोम्मई यांची एकमताने निवड केल्याचं खुद्द येडियुरप्पा यांनीच जाहीर केलं आहे. दरम्यान, बसवराज बोम्माई यांनी शपथविधी होण्यापूर्वी येडियुराप्पांची भेट घेतली आहे.
दरम्यान, आज बसवराज बोम्माई हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, शपथविधी होण्यापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री-नियुक्त बसवराज बोम्माई यांनी केंद्रीय भाजप निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली.