प्रतिनिधी / बेळगाव
हर हर महादेवच्या गजरात बसवाण गल्लीतील श्री बसवाणा देवस्थान कमिटीच्यावतीने सालाबादप्रमाणे बसवाणा यात्रेनिमित्त गुढी पाडव्याच्या दुसऱया दिवशी इंगळय़ांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इंगळय़ांचा कार्यक्रम उत्साहात पार पडल्यानंतर यात्रेला सुरुवात झाली.
प्रथेप्रमाणे यावर्षीही गुढीपाडव्यादिवशी रात्री येथील बसवाण गल्लीतील बसवाणा मंदिरासमोर बैलगाडी जुंपून आंबिल गाडय़ांच्या प्रदक्षिणा घालण्यात आल्या. त्यानंतर बुधवारी सकाळी 10 वाजता बसवाणा मंदिरात विधिवत पूजा करून मंदिरासमोर इंगळय़ांसाठी ठेवण्यात आलेल्या लाकडांना अग्नी देण्यात आला. दुपारी अनंतशयन गल्ली येथे सासनकाठय़ा आणि पालख्यांचे मोरे यांच्या निवासस्थानी कलमठ मठाच्या स्वामीजींच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हर हर महादेवच्या गजरात सासनकाठय़ा आणि पालख्या आल्यानंतर बसवाण गल्लीत मंदिरासमोर धार्मिक विधी झाल्यावर इंगळय़ांचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये सासनकाठय़ा व पालख्या इंगळय़ांमधून धावल्या. यानंतर पारंपरिक कार्यक्रम झाल्यानंतर यात्रेला सुरुवात झाली. यावेळी भाविकांनी मंदिराच्या सभोवताली प्रदक्षिणा घालून प्रार्थना केली. हा इंगळय़ांचा कार्यक्रम गल्लीपुरता मर्यादित ठेवण्यात आला होता.