प्रतिनिधी/ बेळगाव
दुरुस्तीच्या कारणास्तव बसवेश्वर उड्डाणपुलावरील एका बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पण आता दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्याने सोमवारपासून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आता दुसऱया बाजूच्या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुरूस्त झालेल्या रस्त्यावरून वाहतूक सुरू राहणार आहे.
ब्रिटिशकालीन ओव्हरब्रिज हटवून नव्याने उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. मात्र उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच पुलावरील रस्ता खराब झाला आहे. रस्ता वाहतूकीस धोकादायक बनल्याने पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. रस्ता खराब झाल्याने काँक्रिट घालण्यात आले होते. तरीदेखील रस्ता खचला आहे. यामुळे कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यासाठी रस्ता बंद करण्यात आला होता. एका बाजूच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. दुसऱया बाजूचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.