प्रतिनिधी/ बेळगाव
गोवावेस येथील बसवेश्वर चौक ते डाक बंगल्यापर्यंतच्या दुसऱया बाजुचा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. सदर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार असून, सध्या पाईप घालण्याचे काम सुरू आहे. सदर काम गेल्या पाच महिन्यापासून बंद असून बसवेश्वर चौकात मातीचे ढिगारे ठेवण्यात आले असल्याने रस्त्याला डंपिंग डेपोचे स्वरूप आले आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बसवेश्वर चौक ते बॅ. नाथ पै चौक पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्याकरिता रस्त्याच्या दुतर्फा गटारीकरिता पाईप घालून कॉक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. पण बसवेश्वर चौक ते डाक बंगल्यापर्यंत महापालिका व्यापारी संकुलासमोरील रस्त्याचे काँक्रिटीकरण यापूर्वी करण्यात आले आहे. दुसऱया बाजुचे काँक्रिटीकरण करण्यास सुरू करण्यात आले आहे. सांडपाणी वाहण्यासाठी पाईप घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याकरिता हा रस्ता वाहतुकीकरीता बंद ठेवण्यात आला आहे. हे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतुक एकाच बाजुने वळविण्यात आली आहे. पण सदर रस्ता गेल्या चार महिन्यापासून बंद असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. बसवेश्वर चौक ते डाक बंगल्यापर्यंतच्या एका बाजुच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र गटारी आणि साईड पट्टय़ांचे काम अर्धवट असल्याने रस्त्याच्या शेजारी मातीचे ढीगारे साचले आहेत. त्यामुळे रस्ता वाहतुकीस खुला असला तरी अडचणींमुळे वाहतुक कोंडी होत आहे. तर दुसऱया बाजुचा रस्ता चार महिन्यांपासून बंदच ठेवण्यात आला आहे. या रस्त्यावर चरी खोदण्यात आल्या आहेत. तसेच मातीचे ढीगारे टाकण्यात आले आहेत. बसवेश्वर चौकात मातीचे ढीगारे टाकण्यात आल्याने या रस्त्याला डंपिंग ग्राऊंडचे स्वरूप आले आहे. परिणामी वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या चौकातच माती टाकण्यात आली असून, रस्ता देखील खराब झाला आहे. परिणामी या ठिकाणी लहान सहान अपघात होत आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण करून रस्ता खुला करावा अशी मागणी होत आहे.