बेळगाव / प्रतिनिधी
स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील विविध भागांचा विकास साधण्यात येत असून मध्यवर्ती बसस्थानकातील भुयारी मार्गाचे देखील मार्गी लावण्यात आले आहे. या भुयारी मार्गावर शेड उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. शिवाय बसस्थानकाच्या फलाट उभारणीच्या कामाला देखील वेग आला आहे. त्यामुळे लवकरच प्रवाशांच्या सेवेत भुयारी मार्ग आणि फलाट दाखल होईल असे वाटत आहे.
बसस्थानक परिसरातील पादचारी व प्रवाशांची गर्दी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून मध्यवर्ती बसस्थानक व शहर बसस्थानक (सीबीटी) भुयारी मार्गाने जोडण्यात येणार आहे. त्यामुळे मार्गावरील वाहतुक कोंडीचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे. पादचारी प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीकोनातून हा भुयारी मार्ग जोडला गेला आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा आणि स्थानिक प्रवाशांना देखील याचा लाभ होणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकात दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे वाहनधारकांची गर्दी होऊन कोंडी निर्माण होते. त्यामुळे दोन्ही बसस्थानकात ये-जा करण्यासाठी हा भुयारी मार्ग सोयीस्कर होणार आहे.
स्मार्ट बसस्थानकाचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. सुसज्ज बसस्थानकात विविध सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. दरम्यान परिसरात भव्य फलाट उभारला जात आहे. त्यामुळे सर्व स्थानिक बस एकाच ठिकाणी लागण्याची सुविधा होणार आहे. लहान वाहने व पादचारी, प्रवाशांना दोन्ही बसस्थानकांकडे ये-जा करणे सोयीस्कर व्हावे, यासाठी भुयारी मार्ग उभारला जात आहे.