लांब पल्ल्याचा प्रवास झाला सुखकर, सहा महिन्यानंतर एसी बसेस धावल्या,
बेळगाव :/ प्रतिनिधी
गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या परिवहनच्या वातानुकूलित बससेवेला गुरुवारपासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता लांब पल्ल्याचा प्रवास देखील सुखकर झाला आहे. बेळगाव बसस्थानकातून शुक्रवारी तिरूपती, नाशिक, हैद्राबादकडे वातानुकूलित बसेस धावल्या.
कोरोनामुळे सर्व प्रकारची बससेवा साधारण 22 मार्च बंद झाली होती. त्यामुळे बेळगाव विभागाला जवळ-जवळ 110 कोटींचा फटका बसला होता. त्यानंतर शासनाने शिथिलता दिल्यानंतर पहिल्यांदा जिल्हय़ांतर्गत त्यानंतर राज्यांतर्गत आणि त्यानंतर आंतरराज्य बससेवेला प्रारंभ झाला होता. आणि आता परिवहनच्या वातानुकूलित बससेवेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱया प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सध्या ही बससेवा दिवसा सुरू असली तरी प्रवाशांच्या संख्येनुसार येत्या दिवसात रात्री देखील बस उपलब्ध केल्या जाणार असल्याची माहिती परिवहनने दिली आहे.
बेळगाव आगारातून बेळगाव-तिरूपती (चेन्नई मार्गे), बेळगाव-नाशिक व बेळगाव-हैद्राबाद अशी वातानुकूलित बससेवा सुरू झाली आहे. बेळगाव-तिरूपतीसाठी 1300 रुपये, बेळगाव-नाशिक 1100 रूपये तर बेळगाव-हैद्राबाद 1100 रूपये तिकिट दर आहे. सध्या या बसेसना समाधानकारक प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असला तरी प्रवाशांची संख्या वाढल्यास बसेसच्या फेऱया वाढविण्यात येणार असल्याची माहिती बेळगाव आगारातून उपलब्ध झाली आहे.
बेळगाव आगारातून कोकणात बससेवा सुरू
बेळगाव आगारातून महाराष्ट्राच्या कोकण भागातील रत्नागिरी, देवगड, सावंतवाडी, वेंगुर्ला, राजापूर आदी शहराकडे बससेवा सुरू आहे. यापूर्वी कर्नाटक- महाराष्ट्र बससेवा सुरु झाली आहे. मात्र कोकणात धावणाऱया बसेस बंद होत्या. मात्र आता कोकणात धावणाऱया बसेस देखील सुरू झाल्या आहेत. त्याबरोबर गोवा राज्यात देखील बेळगाव विभागातून बससेवा सुरळीत सुरू आहे. एकूण बेळगाव आगारातून स्थानिक, लांब पल्ल्याच्या बसेसबरोबर महाराष्ट्र व गोवा राज्यात बससेवा सुरळीत सुरू आहे. त्य़ामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला असल्याची माहिती बेळगाव आगाराने दिली आहे.