प्रवाशांची वाहने रस्त्यात, प्रवाशांना ये-जा करणे कठीण
प्रतिनिधी /बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानकात पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहनधारकांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी प्रवासी पार्किंग व्यवस्थेअभावी वाहने नियमबाहय़ पद्धतीने पार्क करत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. परिवहन मंडळाने तात्पुरती बसस्थानकात पार्किंग व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
बसस्थानकात सुसज्ज स्मार्ट बसस्थानक उभारण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा ताण तात्पुरत्या बसस्थानकावर पडला आहे. त्यातच या बसस्थानकात सुविधांपेक्षा असुविधांचा वाणवा अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना तोड देत प्रवास करावा लागत आहे. अनलॉकनंतर बससेवेबरोबर प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र बसस्थानकात पार्किंगची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना रस्त्यावरच पार्क करावी लागत आहेत. त्यामुळे बस वाहतुकीवर याचा परिणाम होत आहे.
कामगार, नोकरदार, प्रवाशांची संख्या वाढली आहे. दैनंदिन लांबपल्यांचा प्रवास करणारे प्रवासी बसस्थानकापर्यंत दुचाकीने प्रवास करतात.
आणि बसस्थानकात वाहने पार्क करून पुढील प्रवास करतात. मात्र बसस्थानकात पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने कुठे पार्क करावीत, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे.