विविध मार्गांवर बससेवा सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
विकेंड कर्फ्यूमुळे दोन दिवस ठप्प झालेली बससेवा सोमवारी सुरळीत सुरू झाली. विविध मार्गांवर सर्वप्रकारच्या बस धावल्या. त्यामुळे बसस्थानक पूर्ववतपणे गजबजले. दोन दिवस बससेवा मर्यादित राहिल्याने सोमवारी प्रवाशांची गर्दी वाढली होती. याबरोबरच पहिली ते नववीपर्यंतच्या वर्गांना प्रारंभ झाल्याने विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली होती.
मध्यवर्ती बसस्थानकातून उचगाव, वडगाव, अनगोळ, सुळेभावी, बस्तवाड, काकती, मजगाव, हंदिगनूर, मण्णिकेरी, केदनूर, राजगोळी, मुचंडी, कुदेमनी, सावगाव, रणकुंडये, येळ्ळूर, कट्टणभावी, गोजगा, कंग्राळी बुद्रुक आदी गावांची बससेवा पूर्ववत झाली. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसह विद्यार्थ्यांना सोयिस्कर झाले. स्थानिक बसेससह लांबपल्ल्याच्या बागलकोट, बैलहोंगल, हुबळी, धारवाड, चिकोडी, अथणी, दावणगेरे, सौंदत्ती, गोकाक, निपाणी, रायबाग यासह म्हैसूर व बेंगळूर शहराकडे धावणारी बससेवादेखील सुरू झाली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने विकेंड लागू केला आहे. त्यामुळे मागील आठवडय़ापासून शनिवार-रविवार बससेवेवर परिणाम होत आहे. प्रवाशांअभावी बस थांबून राहत आहेत. मात्र सोमवारपासून प्रवासी संख्येबरोबर बसदेखील विविध मार्गांवर धावल्या.
गोवा राज्याची बस दाखल
बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकात गोवा राज्याची बस दाखल झाली होती. गोवा बसच्या 8 ते 10 फेऱया सुरू आहेत. याबरोबरच कर्नाटक राज्याच्या बसदेखील गोवा राज्यात धावत आहेत. मात्र अद्याप कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा बंदच आहे.