जागोजागी मोठमोठे खड्डे, समस्या सोडविण्याकडे परिवहनचे दुर्लक्ष : प्रवाशांची गैरसोय, सुविधा उपलब्ध करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
सतत हजारो प्रवाशांनी गजबजणाऱया मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात जागोजागी खड्डे पडल्याने बसचालकांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. मागील दोन वर्षांत परिवहनला प्रचंड प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी परिवहन कसोशीने प्रयत्न करत आहे. असे असले तरी बसस्थानकात येणाऱया प्रवाशांना सोयीपेक्षा गैरसोयींचा सामना अधिक करावा लागत आहे. त्यामुळे आवारातील खड्डे बुजवून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
एकीकडे स्मार्टसिटी अंतर्गत सुसज्ज बसस्थानक उभारण्यात येत आहे. तर दुसरीकडे बसस्थानकात निर्माण झालेल्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष झाल्याने बसस्थानक समस्यांच्या गर्तेत सापडले आहे.
आवारातील रस्त्यांची दुर्दशा, शौचालयांची अस्वच्छता, आसनव्यवस्थेची दुर्दशा अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातच परतीच्या पावसाने परिसरात पाण्याची डबकी निर्माण होत आहेत. बसस्थानकातील अंतर्गत आवारात जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यातच पाऊस सुरू असल्याने पाणी साचून राहिल्याने परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. प्रवाशांना यातूनच मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
प्रवाशांचे सुविधांअभावी हाल
आवारात पुरुष व महिलांसाठी शौचालयांची उभारणी केली आहे. मात्र तेथे कोणत्याच सुविधा पुरविल्या नसल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. परिणामी प्रवाशांना नाक मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. अस्वच्छतेमुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे सुविधांअभावी हाल होताना दिसत आहेत. परिवहनने याची दखल घेऊन बसस्थानकात सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी होत आहे.