कामाला प्रारंभ, आवारात काँक्रिटीकरण
बेळगाव / प्रतिनिधी
मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. बसस्थानकाच्या आवारात स्मार्ट बसस्थानकाची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीखातर आवारात तात्पुरत्या बसस्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेऊन स्मार्ट सिटीअंतर्गत बसस्थानकाच्या आवारात काँक्रिटीकरणाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे.
दरम्यान, मागील तीन-चार वर्षांपासून तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या बसस्थानकातून प्रवासी वाहतूक सुरू आहे. स्मार्ट बसस्थानकाचा तब्बल 31 कोटीतून विकास साधण्यात येत आहे. शिवाय प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बसस्थानकाच्या आवारात तात्पुरत्या बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी स्थानिक व लांब पल्ल्याच्या बस थांबत असल्याने प्रवाशांची वर्दळ अधिक असते. दरम्यान, पावसाळय़ात बसस्थानकाच्या आवारात चिखलाचे साम्राज्य पसरत आहे. परिणामी बसस्थानकाच्या आवारात काँक्रिटीकरण करून व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत होती.
मागील चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून काही पडझडदेखील झाली आहे. मध्यवर्ती बसस्थानकातील बसथांब्यावरील पत्र्याची दुर्दशा झाली आहे. वादळी वाऱयामुळे बसथांब्यावरील पत्रे वाकले आहेत. या धोकादायक पत्र्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.