बेळगाव / प्रतिनिधी
गेल्या दोन-चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे मध्यवर्ती बसस्थानकातील अंतर्गत आवारात रस्त्यांची दुर्दशा झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. जागोजागी खड्डय़ांमध्ये पाणी साचून असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानकाच्या आवारात स्मार्ट सिटी अंतर्गत आधुनिक बसस्थानकाचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बसस्थानक उभारण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी सोयीपेक्षा असुविधाच अधिक असल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे.
बसस्थानकात दिवसभर हजारो बसेसची वर्दळ असते. त्यामुळे परिसर नेहमी गजबजलेला असतो. मात्र, सध्या बसस्थानकात जागोजागी खड्डे पडून पाण्याची डबकी निर्माण झाल्याने बसचालकांसह प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खड्डय़ांतून पाणी भरून डबकी निर्माण झाली आहेत. त्यामुळे बसचालकांना येथून ये-जा करण्यासाठी मार्ग शोधावा लागत आहे. बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. त्याचवेळी बस आल्यावर चिखलाचे गढूळ पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत आहे. कामानिमित्त प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र प्रवाशांना यातूनच मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे वृद्ध आणि महिला प्रवाशांचे हाल होत आहेत.
सतत हजारो प्रवाशांनी गजबजणाऱया बसस्थानकातील शौचालयाची दुरव
स्था झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. पुरुष-महिलांसाठी तात्पुरत्या शौचालयाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी कोणतीच सुविधा न पुरविल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. दुर्गंधीमुळे प्रवाशांना नाक मुठीत धरूनच ये-जा करावी लागत आहे.