गुलालाची उधळण, हरहर महादेवचा गजरात यात्रेला प्रारंभ
वार्ताहर/ हलगा
बस्तवाड (ह.) येथील श्री कलमेश्वर देवाच्या यात्रेला उत्साहात सुरुवात झाली. शनिवार दि. 2 रोजी सायंकाळी सजविलेल्या अंबील गाडय़ाची गावात वाजतगाजत, गुलालाची उधळण करत व हर हर महादेवच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी विधिवत पूजा करून गुडी गल्ली येथून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यानंतर आंबील गाडय़ाची मिरवणूक संभाजी गल्ली, यानंतर होसगेरी गल्ली, लक्ष्मी गल्लीमार्गे जाऊन कलमेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी अंबील व घुगऱया वाटण्यात आल्या.
आज यात्रेचा मुख्य दिवस
रविवार दि. 3 रोजी सकाळी मंदिरात विधिवत पूजा होणार आहे. सकाळी 7 नंतर इंगळय़ासाठी लागणारी लाकडे आणण्यात येणार आहेत. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होऊन गाडे गल्लोगल्ली फिरून कलमेश्वर मंदिराकडे रवाना होऊन सायं. 6 वाजता इंगळय़ांचा कार्यक्रम होणार आहे. दरवर्षी इंगळय़ांच्या कार्यक्रमाला परिसरातील हजारो भाविकांची आवर्जून उपस्थिती असते. सोमवारी गावात गुढीपाडव्यानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बस्तवाड यांच्याकडून मोठय़ा स्क्रीनवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित अंगावर काटा आणणारा पावणखिंड हा मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहे.