प्रतिनिधी / म्हापसा
दुबईत अडकून पडलेल्या गोमंतकीय नागरिकांना मदतीचा हात म्हणून मूळ बस्तोडा म्हापसा येथील नागरिक तथा लाईफ, करिअर, एनएलपी या कंपनीच्या एचआर विशांती कौणठकर यांनी तेथील गोमंतकीयांना कडधान्य आदी जीवनावश्यक वस्तू मदत म्हणून दिल्या आहेत.
त्यांनी म्हटल्याप्रमाणे कोविडमुळे युएईमध्ये अनेक गोमंतकीयांना आपले काम सोडावे लागले आहे. अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यांच्याकडे भाडे देण्यासाठी पैशाचा अभाव आहे. शिवाय जेवण, वैद्यकीय सुविधा घेणेही कठीण बनले आहे. काही महिला गर्भवती आहे पण त्यांच्याकडे खाम्यापिम्यासाठी वा वैद्यकीय सेवेसाठी पैसे नाही. विमान सेवा बंद असल्याने ते राज्यात गावी येऊ शकत नाही. याची दखल घेत श्रीमती कौठणकर यांनी गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांच्याशीही बोलणी केली आहे व युएई ते गोवा दरम्यान खास विमान पाठविण्यासाठी त्यांनी भारतीय काऊन्सुलरशीही बोलणी व पत्रव्यवहार केला आहे. तेथून त्यांना हिरवा कंदील दाखविला असल्याची माहिती विशांती यांनी दै. ‘तरुण भारत’ला दिली.
युएईची विमान सेवा परराष्ट्र खात्याच्या परवानगीची वाट पाहत असून मुख्यमंत्र्यांनीही विदेशात असलेल्या गोमंतकीयांना गोव्यात आणण्यासाठी स्वागत केले असल्याचे कौठणकर आंनी म्हटले आहे. त्यांनी एअर इंडियाच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला आहे. गोव्यातील बांधव जे कुणी दुबईमध्ये आहे आणि त्यांना मदतीची गरज असल्यास 00971527077365 येथे संपर्क साधावा असे आवाहन विशांती कौठणकर यांनी दुबईहून दै. तरुण भारत’कडे केले आहे.