लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथे एका भरधाव ट्रकने बसला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री उशिरा हा अपघात झाला असून यात मृत्युमुखी पडलेले सर्व प्रवासी बिहारमधील आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. या अपघातात 24 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांच्यावर लखनौ ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
हरियाणातील पलवाल येथून ही बस बिहारकडे निघाली होती. ही बस अयोध्या-लखनौ महामार्गावरून जात असताना बाराबंकीजवळ या बसला एका भरधाव ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यात बसच्या मागच्या भागात बसलेले 18 प्रवासी जागीच ठार झाले तर 24 जण जखमी झाले. या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.