चन्नम्मा सर्कलजवळील घटनेने खळबळ
प्रतिनिधी / बेळगाव
बसच्या प्रतीक्षेत बसथांब्यावर उभे असलेल्या तुरमुरी (ता. बेळगाव) येथील एका महिलेच्या व्हॅनीटी बॅगमधील सोन्याचे दागिने भामटय़ांनी पळविले आहेत. शुक्रवारी दुपारी 2.30 ते 3 यावेळेत चन्नम्मा सर्कलजवळ ही घटना घडली.
या प्रकरणी वैशाली मारुती भक्तीकर (वय 30, रा. तुरमुरी) या महिलेने खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यांच्या बॅगमधील 49 ग्रॅमचे गंठण व चार ग्रॅमची अंगठी भामटय़ांनी पळविली आहे. पोलीस निरीक्षक धिरज शिंदे व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार आपल्या नातेवाईकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी वैशाली खानापूरला जात होत्या. तुरमुरीहून बेळगावला येवून चन्नम्मा सर्कलजवळ दुपारी त्या खानापूर बसच्या प्रतीक्षेत होत्या. त्यावेळी ही घटना घडली आहे.
वैशाली या खानापूरला जाण्यासाठी बसमध्ये चढताना ही घटना घडली. बॅगची चेन काढून दागिने पळविण्यात आले. थोडय़ा अंतरावर गेल्यानंतर आपल्या बॅगमधील दागिने चोरीला गेल्याचे वैशाली यांच्या लक्षात आले. खडेबाजार पोलीस पुढील तपास करीत आहेत.