वृत्तसंस्था / देहराडून
उत्तराखंडची राजधानी देहराडूनमध्ये रविवारी मोठी दुर्घटना घडली आहे. विकासनगर या भागात बस दरीत कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. जखमीपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमधून प्रवास करणारे बहुतांश लोक एकाच गावाचे रहिवासी होते, असेही समजते.
ही दुर्घटना रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बस 1300 फूट खोल दरीत कोसळल्यावर झालेला मोठा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमी लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. ग्रामस्थांनीच दुर्घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस आणि एसडीआरएफच्या पथकांनी बचाव मोहिमेस प्रारंभ केला.
ही दुर्घटना ओव्हरलोडिंगमुळे घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या मिनीबसमधून 25 जण प्रवास करत होते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी जिल्हा प्रशासनाला बचाव तसेच मदतकार्याला वेग देण्याचा आणि जखमींना त्वरित उपचार उपलब्ध करविण्याचे निर्देश दिले आहेत.