रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा, वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनचालकांची गैरसोय
वार्ताहर /सांबरा
सांबरा येथे शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास राज्य परिवहन मंडळाची गोकाक-बेळगाव बस रस्त्यातच पंक्चर झाल्याने ट्रफिक जॅम होऊन रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मात्र तेथे पोलीस वेळीच दाखल न झाल्याने सुमारे तासभर वाहने थांबून होती. त्यामुळे वाहन चालकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
सांबरा येथील जुन्या पोलीस चौकीसमोरच केए 42 एफ 1266 या क्रमांकाची बस पंक्चर झाली. सायंकाळच्या दरम्यान या रस्त्यावर वाहनांची जास्त वर्दळ असते. अशातच रस्त्यावर दोन्ही बाजूने समोरासमोर वाहने येऊन थांबल्याने वाहतुकीची आणखी कोंडी झाली. रस्त्यावरच बस पंक्चर झाल्याने व इतर वाहनांना रस्त्यावरून जाता येत नसल्याने काही क्षणातच रस्त्यावर लांबच्या लांब रांगा लागल्या. मात्र या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेथे एकही पोलीस नसल्याने या समस्येत आणखी भर पडली. सुमारे तासभर झालेल्या ट्रफिक जॅममुळे वाहन चालकांची गैरसोय झाली. तासाभरानंतर तेथे एक पोलीस दाखल झाला व त्याला काही गावातील युवकांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. त्यामुळे अखेर रस्ता खुला झाला.
सध्या सांबरा येथे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून रस्त्यावरच वाहने उभी केली जातात तर काही ठिकाणी फुटपाथवर अतिक्रमण करून दुकाने थाटण्यात आल्याने पादचारी रस्त्यावरून चालत जातात. अशाने या रस्त्यावर वरचेवर ट्रफिक जॅमसारख्या समस्या उद्भवत असतात. त्यासाठी पोलीस यंत्रणेने व ग्रा. पं. ने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत याठिकाणी व्यक्त करण्यात येत होते.