धामणे-सीबीटी बस नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास : बससेवा पूर्ववत करण्यासाठी निवेदन
वार्ताहर / धामणे
शासनाच्या आदेशाप्रमाणे गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा, कॉलेज 1 जानेवारी 2021 पासून सुरू झाली खरी, पण शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेला ये-जा करण्यासाठी बसची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
धामणे, कुरबरहट्टी, मासगोंडहट्टी, देवगणहट्टी येथील शेकडो विद्यार्थी दररोज बेळगाव शहरात शिक्षणासाठी ये-जा करतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा-कॉलेजपासून सर्वच व्यवहार बंद होते. परंतु एक जानेवारीपासून शाळा-कॉलेज शासनाच्या आदेशानुसार सुरू झाली. परंतु धामणे ते सीबीटी बेळगाव बससेवा पूर्ववत सुरू झालेली नाही. त्यामुळे येथील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सीबीटी बेळगाव ते देवगणहट्टी बससेवा व्हाया धामणे येथून दिवसातून चार वेळा सुरू असली तरी शाळेच्या वेळेत नसल्याने विद्यार्थ्यांना वडाप टेम्पोने यावे लागत आहे. त्यामुळे तासन्तास ताटकळत थांबावे लागत आहे.
संबंधित बससेवेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या वेळेत बस पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी धामणे, कुरबरहट्टी, मासगोंडहट्टी, देवगणहट्टी येथील विद्यार्थ्यांनी केली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले आठ महिने सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. परंतु 1 जानेवारीपासून शाळा-कॉलेज सुरू झाल्याने बंद असलेली सीबीटी-धामणे बससेवा पूर्ववत सुरू करा, अशा मागणीचे निवेदन धामणे येथील विद्यार्थिंनी ग्रा. पं. पीडीओ वीणा हडपद यांना देण्यासाठी गेल्या असता त्यांना एक तास ताटकळत थांबावे लागले. एक तासानंतर दोनच विद्यार्थिनींना ग्रा. पं. कार्यालयात बोलावून पीडीओंनी निवेदन स्वीकारल्याचे समजते. यानंतर विद्यार्थ्यांनी बससेवा अधिकाऱयांना ग्रा. पं.तर्फे तातडीने कळवून बंद असलेली बससेवा पूर्ववत सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी रंजना बेळगावकर, पुणिता पाटील, श्रेया पाटील, कोमल बेळगावकर, सुनीता मादाकाचे, पूजा बेळगावकर, सारिका पाटील, अर्चना डुकरे, चांगुणा रेमाणाचे आदी विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.