वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा पुरुष वरिष्ठ फुटबॉल संघाचे बहरिन व बेलारुस या संघांविरुद्ध दोन मित्रत्वाचे आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यात आले आहेत. हे सामने बहरिनमधील मनामा येथे 23 व 26 मार्च रोजी होणार असल्याचे एआयएफएफने शुक्रवारी सांगितले.
2023 एएफसी आशियाई चषक पात्रतेच्या तिसऱया फेरीच्या तयारीसाठी या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा जूनमध्ये होणार आहे. ‘सध्याची परिस्थिती पाहता या लढतींसाठी आम्हाला ज्या प्रतिस्पर्धी संघांची अपेक्षा होती, ते मिळणे खूपच कठीण होते. पण या दोन सामन्यांची सोय करता आली, याचा आम्हाला खूप आनंद आहे,’ असे संघाचे प्रमुख प्रशिक्षक इगोर स्टिमॅक म्हणाले. 2023 एएफसी आशियाई चषकाच्या तिसऱया व शेवटच्या पात्रता फेरीसाठी आम्ही पुरेपूर तयारी करण्यावर या लढतीत भर देणार आहोत. या लढती त्यासाठी उपयुक्त ठरतील, असेही ते म्हणाले.
बहरिन व बेलारुस हे दोन्ही संघ मानांकनात आमच्यापेक्षा वरच्या स्थानावर असून आयएसएलमधील तयारीमुळे आपले खेळाडू या लढतीसाठी सज्ज झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले. बहरिन फिफा मानांकनात 91 व बेलारुस 94 व्या स्थानावर आहे. भारत या मानांकनात 104 व्या क्रमांकावर आहे.