बेंगळूर : ऑक्सिजन पुरवठय़ासाठी राज्य सरकारने केलेल्या विनंतीची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. केंद्राने बहरेनहून आलेला 20 मेट्रिक टन ऑक्सिजनसाठा कर्नाटकासाठी पाठवून दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिली. कर्नाटकाला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी वायुदलामार्फत पाच रिकामे टँकर भुवनेश्वर, ओडिशाला पाठविण्यात आले आहेत. 74 मेट्रिक टन इतके ऑक्सिजन भरलेले कंटेनर 7 किंवा 8 मे रोजी बेंगळूरला पोहोचतील, अशी माहितीही येडियुराप्पा यांनी दिली आहे. देशात कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्याने विविध देशांनी भारताला ऑक्सिजन मदत स्वरुपात देण्याची तयारी दर्शविली. हा ऑक्सिजनसाठा देशात आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन समुद्र सेतू-2 हाती घेतले आहे. याचाच भाग म्हणून नौकादलाच्या आयएनएस तलवार या जहाजातून बुधवारी बहरेनहून आणलेला 54 मे. टन ऑक्सिजन मंगळूर बंदरावर उतरविण्यात आला.