परिस्थिती माणसाला बरंच काही करावयास लावते, निदान तसं सांगितलं जातं, अशी स्थिती आहे. याच संदर्भातली ही मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर शहरातील घटना आहे. एका चोरटय़ानं एका लोकरीची वस्त्रं विकणाऱया व्यापाऱयाची पत्नी आणि मोलकरीण यांना खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवून बांधून घातलं. नंतर त्यांचं घरातून चार लाख रूपयांहून अधिक रकमेची लूट केली. अशा घटना बऱयाचदा घडतात. त्याचं काही विशेष वाटतही नाही. तथापि, या लुटीनंतर जे घडलं ते अनोखं आहे. त्यामुळं ही घटना चर्चेचा विषय बनली.
या बदमाशानं या दोघींची लूट केल्यानंतर, चक्क मालकीणीचे पाय धरले आणि लुटीचं करण स्पष्ट केलं. तो म्हणाला, ‘काय करू ?, माझ्या बहिणीचं लग्न आहे. लग्न करून देण्यासाठी पैसा लागतोच. तो माझ्याजवळ नाही. तेव्हा हा एकच मार्ग उरला होता. आपण मला आईसारख्या आहात. मला क्षमा करा.’ असं म्हणून तो व त्याच्या साथीदारानं तेथून पोबारा केला. नंतर या दोघींनी कशीबशी सुटका करून घेतली आणि व्यापाऱयाला ही घटना कळविली. पोलीस तपास सुरू झाला आहे.
या व्यापाऱयाचं नावं आहे, दिलीप कुकरेजा, तर त्याची पत्नी आणि मोलकरणीचं नाव वंदना व सुनिता असं आहे. लूट करणारा माणूस डिलिव्हरी बॉय असल्याचा बहाणा करून घरात आला होता, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. लूट करणाऱयानं खरोखरच बहिणीच्या लग्नासाठी हे कृत्य केलं, की, नंतर क्षमा वगैरे मागून तसा देखावा केला, हे तपासानंतरच कळणार आहे. अर्थात, कारण काहीही असलं तरी हा गुन्हाच आहे आणि त्यामुळं कारवाई तर होणारच. तसंच बहिणीच्या किंवा अन्य कोणाच्या लग्नासाठी असं करणं हा आदर्श मानला जाऊ शकत नाही, हे देखील प्रत्येकानं लक्षात घेणं निश्चितच आवश्यक आहे.