सोनू सूदने घेतली भूमिका : मालविकाने स्वबळावर यश मिळवावे
वृत्तसंस्था /चंदीगड
कोरोना संकट काळात लोकांची मदत करून चर्चेत आलेला अभिनेता सोनू सूदची बहिण मालविका पंजाब विधानसभा निवडणूक लढविणार आहे. मालविकाने काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. परंतु याचदरम्यान सोनू सूदने स्वतःच्या बहिणीसाठी प्रचार करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.
निवडणुकीत उतरण्याचा निर्णय माझ्या बहिणीचा आहे, या निर्णयाशी माझा कुठलाच संबंध नाही. बहिणीसाठी मी कुठल्याही प्रकारे प्रचार करणार नाही. एक भाऊ म्हणून मालविकाने स्वतःच्या बळावर यशस्वी व्हावे अशी माझी इच्छा आहे. मी अभिनय आणि लोकांना मदत करून आनंदी आहे आणि भविष्यातही हेच करू इच्छितो असे त्याने म्हटले आहे.
यापूर्वी सोनू सूद सुद्धा राजकारणात उतरणार असल्याचा कयास वर्तविला जात होता. कारण तो एका छायाचित्रात बहिण, मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि नवज्योत सिंह सिद्धू यांच्यासोबत दिसून आला होता. माझी बहिण एका नव्या प्रवासावर असून तिने यात चांगले यश मिळवावे अशी माझी इच्छा असल्याचे त्याने ट्विट करत म्हटले होते. यामुळे सोनू सूद स्वतःच्या बहिणीसाठी प्रचारात उतरणार असल्याचे मानले जात होते.
मोगातून लढविणार निवडणूक
मालविकाला काँग्रेस पक्षाकडून मोगा मतदारसंघाची उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता आहे. परंतु या घडामोडीमुळे नाराज मोगाचे विद्यमान आमदार डॉ. हरजोत कमल यांचे समर्थक विरोध करत आहेत. त्यांनी पक्षनेतृत्वाकडे कुठल्याही बाहेरील व्यक्तीला उमेदवारी न देण्याची मागणी केली आहे.