वार्ताहर/ अथणी
गुंडेवाडी (ता. अथणी) येथील बेवनूर रस्त्याला लागून असणाऱया कुपवाड यांच्या मळय़ातील घरामागे असलेल्या शेततळय़ात पोहण्यास गेलेल्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. पारिस नेमिनाथ कुपवाड (वय 15) व सन्मती नेमिनाथ कुपवाड (वय 13) अशी मृत बहीण-भावाची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी की, लॉकडाऊनमुळे शाळेला सुटी असल्याने पारिस व सन्मती हे दोघेही पोहण्यास शेततळय़ावर गेले होते. पारिस आपली बहीण सन्मतीला पोहण्यास शिकवित होता. परंतु, सन्मतीच्या कंबरेची दोरी तुटल्यामुळे ती बुडू लागली. तिला वाचविण्यास पारिस गेला असता सन्मतीने जीव वाचविण्यासाठी त्याला मिठी मारली. त्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाला. सदर वृत्त नातेवाईकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच लोकांनीही या ठिकाणी गर्दी केली होती. घटनेचे वृत्त कळताच अथणी पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली व जागेवरच उत्तरीय तपासणी करून दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. दुपारी शोकाकुल वातावरणात दोघा बहीण भावावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळी लोकप्रतिनिधीनी भेट दिली नसल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त करण्यात आला.
अथणी पोलिसात या घटनेची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.