पृथ्वीराज चव्हाण यांचा पाठपुरावा, पदाधिकारी, अधिकाऱयांकडून पाहणी
प्रतिनिधी/ कराड
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीत कोरोना बाधित रुग्णांना बेडची टंचाई कराड शहरातील कोविड रुग्णालयात होत आहे. हे लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून स्व यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे 50 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या कामाची पाहणी आज कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, कराडचे प्रांत उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी रमाकांत डाके व गजानन आवळकर यांनी केली.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात पृथ्वीराज चव्हाण हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये पहिल्या दिवसांपासून जनतेसाठी कार्यरत आहेत. त्यांनी नुकताच 60 लाख रुपयांचा निधी शहरातील कोरोना रुग्णालयांच्या मदतीसाठी दिला आहे. या निधीतून 2 रुग्णवाहिका व 10 व्हेंटिलेटर दिले जाणार आहेत. लवकरच यांचे लोकार्पण होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला मात देण्यासाठी ते वेळोवेळी जिल्हाधिकारी व जिह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सोबत चर्चा करीत आहेत. यामधूनच शहरातील कोरोना रुग्णालयांचे अधिग्रहण होऊन 1400 हून अधिक बेडचे नियोजन केले आहे. कोरोना उपचार सेंटर या आठवडय़ात पूर्ण होईल, अशी माहिती प्रांत उत्तम दिघे यांनी दिली.