जोयडय़ात कुणबी समाजातर्फे कंदमूळ महोत्सव : कुंभारवाडा, जोयडा, संत्री, गांगोडा, नागोडा आदी खेडय़ांचा समावेश
प्रतिनिधी / जोयडा
जोयडा कुणबी भवन येथे कुणबी समाजातर्फे कंदमूळ महोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन कोल्हापूर विश्वविद्यालयाचा वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख श्रीरंग यादव यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून बेंगळूर संस्थेचे वैज्ञानिक सुभाषचंद्र, नानीज विश्वविद्यालयाचे प्रा. वेर्णेकर, शिर्सी महाविद्यालयाचे प्रा. भालचंद्र हेगडे व जि. पं. सदस्य रमेश जोंजू नाईक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुणबी समाजाचे अध्यक्ष डॉ. जयानंद डेरेकर होते.
यावेळी कोल्हापूर विश्वविद्यालय वनस्पतीशास्त्र प्रमुख श्रीरंग यादव कार्यक्रमाचे उद्घाटन करून म्हणाले, प्राचीन काळापासून नागरिकांचा प्रमुख आहार कंदमूळ होते. जंगलात राहणार प्रत्येक मनुष्य कंदमुळे खात होता. त्यानंतर वासती करून राहू लागल्यानंतर कंदमुळे आपल्या परिसरात लावून त्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. आता फक्त आदिवासी समाज जेथे राहतो त्या भागात वेगवेगळय़ा प्रकारची कंदमुळे पहावयास मिळतात, असे यादव यांनी सांगितले.
वाणिज्य विश्वविद्यालयाचे प्रा. वेर्णेकर म्हणाले, जोयडा तालुका वन्य प्रदेशाने व्यापलेला आहे. येथील जंगलात अनेक प्रकारची वनौषधी आहेत. येथील आदिवासी कुणबी समाज पारंपरिक खाद्य पदार्थांचे रक्षण करत वेगवेगळय़ा कंदमुळांचे उत्पादन घेत आहे. तसेच कंदमुळे औषधी वनस्पती असल्यामुळे त्याचा उपयोग इतर नागरिकांनी करून घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बेंगळूर संस्थेचे वैज्ञानिक सुभाषचंद्र, शिर्सी महाविद्यालयाचे प्रा. भालचंद्र हेगडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे आयोजक व अध्यक्ष जयानंद डेरेकर यांनी महोत्सवाची माहिती दिली. या महोत्सवात कंदमुळे विक्री करण्यासाठी महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. कुंभारवाडा, जोयडा, संत्री, गांगोडा, नागोडा, पांजेली, तेळोळी, मारसंगळ, नगरी, कारटोळी, मुडिये, डिगळंब व इतर खेडय़ातून नागरिक कंदमुळे विक्रीसाठी महोत्सवात घेऊन आले होते.