प्रतिनिधी / सांगली
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या प्रलंबित अर्जासाठी सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांच्या कार्यालयासमोर सोमवारी बहुजन समाज पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
यामध्ये उपस्थित बांधकाम कामगारांच्या विधवा पत्नींनी बांगड्या फोडून निषेध केला. बांधकाम कामगार मंडळाकडून अनेक योजना सुरू आहेत परंतु त्या योजना कामगारांपर्यंत पोहोचत नाहीत. हजारो बांधकाम कामगार योजनेपासून वंचित राहतात. कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्त्या गेले चार-पाच वर्षे मिळालेल्या नाहीत व इतर बांधकाम कामगारांच्या विधवांच्या पेन्शनही मिळालेल्या नाहीत. बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्या, कोरोनाचे पाच हजार, गंभीर आजाराचे अर्ज, प्रलंबित आहेत, अशा अनेक प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांची निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी स्वीकारले व आंदोलनकर्त्यांना त्यांच्या मागण्या मान्य करू असे आश्वासन दिले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बांधकाम कामगारांनी व बहुजन समाज पार्टीने आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मागण्या मान्य नाही झाल्या तर कामगार आयुक्त मुंबई यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा सुद्धा दिलेला.
यासाठी महाराष्ट्र प्रदेश सचिव शंकर माने, बहुजन कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मन्सूर आत्तार, महासचिव देवानंद जावीर, जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब करडे, बहुजन समाज पार्टी महासचिव भूषण चंदनशिवे, शहराध्यक्ष सुमित गाडे, सुशांत पवार, संजय थोरवत, मोहन जावीर, जिल्हा उपाध्यक्ष जयश्री फडके, तालुका अध्यक्ष उज्वला धोत्रे, सरपंच संजना आठवले, रुकसाना आत्तार, सिद्धनाथ माने, सुनिल खोत, विजय वाघमारे, सुनिता मदने, सुषमा रास्ते आदी उपस्थित होते.