वृत्तसंस्था/ ढाक्का
‘सामनावीर’ तसेच कर्णधार मेहमुदुल्लाच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर यजमान बांगलादेशने बलाढय़ ऑस्ट्रेलियावर 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी मिळविताना शुक्रवारच्या तिसऱया सामन्यात कांगारूंचा 10 धावांनी पराभव केला. बांगलादेशच्या क्रिकेट इतिहासामध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियावर मालिका विजय मिळविला आहे.
या तिसऱया सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 127 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 4 बाद 117 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 10 धावांनी गमवावा लागला.
बांगलादेशच्या डावात कणधार मेहमुदुदुल्लाने 53 चेंडूत 4 चौकारांसह 52, शकीब अल हसनने 17 चेंडूत 4 चौकारांसह 26, असिफ हुसेनने 13 चेंडूत 1 षटकार आणि एक चौकारांसह 19, नुरूल हसनने 5 चेंडूत 1 षटकारांसह 11 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात 2 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे इलिसने 34 धावांत 3, हॅजलवूडने 16 धावांत 2, झंपाने 24 धावांत 2 गडी बाद केले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या नाथन इलिसने हॅट्ट्रीक साधली. बांगलादेशच्या डावातील शेवटचे षटक इलिने टाकले. या षटकातील चौथ्या चेंडूवर इलिसने मेहमुदुल्लाचा त्रिफळा उडविला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर त्याने मुस्ता फिजुर रेहमानला तसेच सहाव्या चेंडूवर मेहदी हसनला 6 धावांवर झेलबाद केले. पावसामुळे हा सामना 90 मिनिटे उशिरा खेळविण्यात आला. कर्णधार मेहमुदुल्लाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या इलिसचे टी-20 प्रकारात हे पदार्पण होते.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 4 बाद 117 धावा जमविल्या. मिचेल मार्शने 47 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 51, मॅकडरमॉटने 41 चेंडूत 2 षटकारांसह 35, कॅरेने 15 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 20, ख्रिस्टेनने 10 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 7, हेन्रिक्सने 2 आणि कर्णधार वेडने 1 धाव जमविली. ऑस्ट्रेलियाच्या डावात 4 षटकार आणि 8 चौकार नेंदविले गेले. बांगलादेशतर्फे एस इस्लामने 29 धावांत 2 तर नेसुम अहमद आणि शकीब अल हसनने प्रत्येकी एक गडी बाद केला. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरातमध्ये होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेश संघाचे भवितव्य निश्चितच उज्जवल असल्याचे प्रतिपादन कर्णधार मेहमुदुल्लाने केले आहे.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश 20 षटकांत 9 बाद 127 (मेहमुदुल्ला 52, शकीब अल हसन 26, अतिफ हुसेन 19, नुरूल हसन 11, नाथन इलिस 3-34, हॅजलवूड 2-16, झंपा 2-24). ऑस्ट्रेलिया- 20 षटकांत 4 बाद 117 (मार्श 51, मॅकडरमॉट 35, कॅरे नाबाद 20, एस. इस्लाम 2-29, नेसुम अहमद 1-19, शकीब अल हसन 1-22).